राष्ट्रपती म्हणतात, “मला ५ लाख पगार मिळतो, त्यातला पावणे ३ लाख टॅक्स जातो, माझ्यापेक्षा जास्त तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:40 PM2021-06-25T22:40:14+5:302021-06-25T22:41:08+5:30
President Ramnath Kovind News: सर्वात जास्त पगार देशातील राष्ट्रपतीला मिळतो. आम्हाला ५ लाख पगार आहे
कानपूर – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कानपूर जिल्ह्यातील त्यांच्या परौंख गावी गेले. कानपूरच्या देहात जिल्ह्यातील झीझक रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी संध्याकाळी ६.१० मिनिटांनी राष्ट्रपतींची स्पेशल ट्रेन पोहचली. मी आज इथं तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना म्हटलं.
रामनाथ कोविंद म्हणाले की, या रेल्वे स्टेशनबाबत प्रत्येक आठवण ताजी आहे. जेव्हा मी खासदार होतो तेव्हा झीझक रेल्वे स्टेशनवर अनेक ट्रेन्स थांबत होत्या त्या कालांतराने बंद झाल्या. कोरोनामुळे कदाचित हे झालं असावं. येणाऱ्या काळात पुन्हा या रेल्वे स्टेशनवर सर्व ट्रेन्सला थांबा मिळेल. मी तुमच्यापासून दूर नाही. प्रोटोकॉलनुसार काही अंतर आहे. तुम्ही तुमचं म्हणणं आणि समस्या मला सांगू शकता. देशात स्वातंत्र्यानंतर बराच विकास झाला आहे. या विकासात तुम्हीही योगदान दिले आहे असं राष्ट्रपती म्हणाले.
शिक्षकांना सर्वाधिक पगार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, सर्वात जास्त पगार देशातील राष्ट्रपतीला मिळतो. आम्हाला ५ लाख पगार आहे. ज्यातील पावणे तीन लाख करात जातात. तर वाचले किती? आणि जितके वाचले त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना आणि अन्य लोकांना मिळतो. याठिकाणी काही शिक्षक बसलेत त्यांनाही सर्वाधिक पगार आहे.
असा असेल कार्यक्रम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कानपूरला पोहोचतील आणि दुसर्याच दिवशी आपल्या जुन्या ओळखीच्या लोकांना भेटतील. यानंतर हेलिकॉप्टरने राष्ट्रपती त्यांच्या मूळ गावी परौंख व कस्बा पुखराया येथे जातील. त्यांच्या सन्मानार्थ तेथे २७ जून रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेथून ते २७ तारखेला कानपूरला परत येतील. रात्री येथे मुक्काम केल्यानंतर ते २८ जून रोजी सकाळी आपल्या विशेष ट्रेनने लखनऊला रवाना होतील. ते दोन दिवस लखनौमध्ये थांबतील आणि २९ जून रोजी संध्याकाळी हवाई दलाच्या विमानाने दिल्लीला पोहोचतील.
तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता. भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली ते देहरादून विशेष रेल्वेने प्रवास केला होता. कोविंद यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत ही अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे. ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता. डॉ. प्रसाद यांच्या नंतरच्या राष्ट्रपतींनी देखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले. आज रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीत राष्ट्रपतींच्या स्वागताला हजर होते.