उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या मुद्यांपासून दूर राहा- राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 08:24 PM2018-08-14T20:24:49+5:302018-08-14T20:26:31+5:30
सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन
नवी दिल्ली: देश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं. ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करत होते. देशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं.
राष्ट्रपतींनी देशवासींयाना संबोधित करताना केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक केलं. 'देशातील परिस्थिती झपाट्यानं बदलत असून वेगानं विकास होत आहे. याचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे,' असं कोविंद म्हणाले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाचा विशेष उल्लेख केला. 'महात्मा गांधींना पूर्ण जगात सन्मान दिला जातो. संपूर्ण जग त्यांचा आदर करतं. त्यांचे आदर्श आपण समजून घ्यायला हवेत. गांधीजींनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली होती. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेला प्राधान्य दिलं होतं,' अशा शब्दांमध्ये त्यांनी गांधीजींचं स्मरण केलं.
राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात महिलांचाही विशेष उल्लेख केला. 'आपल्या समाजात महिलांची विशेष भूमिका आहे. महिलांना व्यापक स्वातंत्र्य मिळाल्यास देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचं सार्थक होईल', असं राष्ट्रपती म्हणाले. 'कुटुंबातील मातांना, बहिणींना, मुलींना घरात आणि घराबाहेरील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. महिलांना त्यांच्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याची संधी द्यायला हवी. महिलांना सुरक्षित वातावरण आणि विकासाच्या संधी मिळायला हव्यात,' असंही कोविंद यांनी म्हटलं.