राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा, पद सोडावं लागणारे मोदी सरकारमधले पहिलेच मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:29 IST2018-10-18T11:47:57+5:302018-10-18T14:29:14+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेतील परिच्छेद 75 च्या तरतुदीतील कलम (2) अन्वये पंतप्रधान यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राष्ट्रपतींनी स्वीकारला राजीनामा, पद सोडावं लागणारे मोदी सरकारमधले पहिलेच मंत्री
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंतर हा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वादग्रस्त परिस्थितीनंतर राजीनामा देणारे अकबर हे मोदी सरकारमधील पहिलेच मंत्री ठरले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेतील परिच्छेद 75 च्या तरतुदीतील कलम (2) अन्वये पंतप्रधान यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्विकारला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकबर यांचा राजीनामा स्विकारला. त्यानंतर प्रकियेचा भाग म्हणून तो राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठिवण्यात आला होता. अकबर यांच्यावर अनेक पत्रकार महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत.
दरम्यान, लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे वादात सापडलेले एम.जे. अकबर यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तब्बल 15 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानं अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांची खासदारकीही धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या नेत्यांनीच त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अकबर यांना भाजपानं मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं आहे.
पुढील महिन्यात मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. अकबर यांच्यावरील आरोपांचा फटका या निवडणुकीत भाजपाला बसू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील भाजपा नेत्यांनी अकबर यांची खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.