महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:07 PM2019-02-06T18:07:52+5:302019-02-06T18:13:53+5:30
प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली : प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात आली.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ कलाकारांसह देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७ चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात आले. श्री.भडकमकर यांनी गेली दोन दशके नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे.
नाटक, सिनेमा, कथा कादंबरीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार लेखक म्हणून सहजपणे वावरणारे श्री.भडकमकर उत्तम कलावंतही आहेत. ‘चुडैल’ हा कथासंग्रह, ‘असा हा बालगंधर्व’ ही बालगंधर्वांचा जीवनपट उलगडणारी कादंबरी आणि आजच्या मालिका विश्वाच्या पडद्यामागच्या वास्तवाचं दर्शन घडवणारी ‘एट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात कलेचे धडे गिरवणारे श्री.भडकमकर यांनी अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहिली आहे. ‘आम्ही असू लाडके’ हा मराठी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला आहे. विविध नाटकेही त्यांनी लिहिली आहेत.
नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आले. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या सोबत त्यांनी 1974 ते 1984 अशी सलग दहा वर्षे 25 कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. श्री.शानबाग यांनी कला क्षेत्रातील मित्रांच्या सहकार्याने 1985 मध्ये ‘अपर्णा रिप्रेटरी कंपनीची’ स्थापना केली व या माध्यमातून वर्षाला 50 नाट्य प्रयोग होत असत. श्री.शानबाग यांनी विजय तेंडुलकर लिखीत ‘सायकल वाला’, महेश एलकुंचवार लिखीत ‘प्रतिबिंब’ आणि ‘शफत खान यांचे किस्से’, सयाजी शिंदे लिखीत ‘तुंबुरा’ आणि रामु रामनाथन यांच्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.प्रसिद्ध तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. श्री.सामसी यांनी पं. एच. तारंथनराव यांच्याकडून वयाच्या चौथ्यावर्षांपासून तबला वादनाचे धडे घेतले. यानंतर श्री.सामसी यांना सलग दोन दशके प्रसिद्ध तबला वादक उस्ताद अल्लारखाँ खान यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रसिद्ध गायक व नृत्यकालाकारांना श्री.सामसी यांनी तबल्याची साथ केली यात उस्ताद विलायत खाँ, पं. अजय चक्रवर्थी, पं. भिमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं.शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांचा समावेश आहे.लोककलांचे अभ्यासक डॉ.प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात आले. लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमरशेख अध्यासनाचे प्रमुख असलेले डॉ.खांडगे १९७८ पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर, लोककला संशोधन केंद्राचे ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे आणि ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली. डॉ.खांडगे यांनी चीनमध्ये लोककला लोकसंगीत परिषदमध्ये चार वेळा प्रतिनिधित्व केले, तर सॅन होजे येथे विश्व मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी व्याख्यान दिले. नॅशविलमध्ये अमेरिकन फोकलोअर सोसायटीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ते राज्य आणि केंद्राच्या विविध सांस्कृतिक समित्यांवर कार्यरत आहेत. ‘प्रयोगात्मक लोककला’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९५२ पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
डॉ.संध्या पुरेचा यांना अकादमीची फेलोशीप
ललित कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ.संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. प्रसिद्ध भरत नाट्यम् नृत्यांगणा असलेल्या डॉ.पुरेचा या मुंबई स्थित कला परिचय संस्थेच्या संचालिका तसेच सरफोजीराजे भोसले भरत नाट्यम प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या सचिव आहेत. आचार्य पार्वती कुमार यांच्याकडून डॉ.पुरेचा यांनी भरत नाट्यमचे धडे घेतले. त्यांनी ‘नाट्य शास्त्र’ विषयावर संशोधनही केले आहे. ३ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.