राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे वेतन वाढणार
By admin | Published: August 10, 2016 04:55 AM2016-08-10T04:55:12+5:302016-08-10T04:55:12+5:30
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे वेतन आणि भत्त्यांना योग्य ठेवण्यासंबंधीचे विधेयक संसदेत बुधवारी मांडण्याची पूर्ण तयारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे वेतन आणि भत्त्यांना योग्य ठेवण्यासंबंधीचे विधेयक संसदेत बुधवारी मांडण्याची पूर्ण तयारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.
उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘राष्ट्रपतींचे वेतन दरमहा दीड लाख रुपये आणि उपराष्ट्रपतींचे १.२५ लाख रुपये निश्चित आहे. हे वेतन मंत्रिमंडळ सचिवाच्या वेतनापेक्षाही खूप कमी आहे. ही विसंगती दूर करण्याचा उद्देश या विधेयकामागे आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना सरकारने जारी केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या सचिवांचे वेतन दरमहा २.५ लाख रुपये झाले आहे.’’
पंतप्रधान, मंत्री आणि इतरांचे वेतन मंत्रिमंडळ सचिवांच्या वेतनापेक्षा १० हजार रुपये जास्त असेल अशी स्वतंत्र अधिसूचना काढावी आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वेतनरचनेसाठी विधेयक आणावे, असा अनेक प्रस्तावांतील एक आहे. राष्ट्रपतींचे वेतन २.९० लाख ते ३.३० लाख रुपये असेल. या मुद्द्यावर गृहमंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील. दरम्यान, संसद सदस्यांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा गेल्या सात वर्षांपासून लोंबकळत असलेला प्रश्नही सरकारने हाती घेतला आहे.