कुलगुरूंच्या बडतर्फीस राष्ट्रपतींकडून मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2016 03:19 AM2016-02-16T03:19:50+5:302016-02-16T03:19:50+5:30
विश्व भारतीचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी मंजुरी दिली.
नवी दिल्ली : विश्व भारतीचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी मंजुरी दिली. एखाद्या केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूला पदावरून हटविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
‘विश्व भारतीचे कुलगरू दत्तगुप्ता यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंत्रालयाने दिला होता. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे,’ असे मंत्रालयाचे प्रवक्ते घनश्याम गोयल म्हणाले. दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस करणारी फाईल मंत्रालयाने या महिन्याच्या प्रारंभी राष्ट्रपतींकडे पाठविली होती. दत्तगुप्ता यांच्याविरुद्ध वित्तीय आणि प्रशासकीय गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)तत्पूर्वी राष्ट्रपतींनी कुलगुरूंना हटविण्याच्या शिफारशीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मंत्रालयाने कायदा मंत्रालयाचे मत मागितले होते. याआधी राष्ट्रपतींनी दत्तगुप्तांच्या बडतर्फीची शिफारस करणारी फाईल दोनदा परत केली होती. परंतु कायदा मंत्रालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठिंबा दिल्यानंतर ही फाईल पुन्हा राष्ट्रपतींना सादर करण्यात आली आणि सोमवारी राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले.