उद्या विरोधकांची महत्वपूर्ण बैठक; तत्पूर्वी CM ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:21 PM2022-06-14T18:21:47+5:302022-06-14T18:23:03+5:30
Presidential Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जून रोजी ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.
Presidential Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच उमेदवार निवडीसाठी पक्षांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि विरोधी उमेदवारावर एकमताने मत बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकले. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी विरोधकांची बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी शरद पवारांची भेट घेल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असून, 21 जुलै रोजी देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत शरद पवारांचे नाव होते, पण त्यांनी आधीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसने पवार यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गेल्या आठवड्यात सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, आता पवारांकडूनच यास नकार देण्यात आला आहे.
Ms. Mamata Banerjee called upon me at my residence in Delhi today.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 14, 2022
We had a detailed discussion on various issues related to our country.@MamataOfficialpic.twitter.com/ACv62oZtqq
उद्या विरोधकांची बैठक
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 15 जून रोजी आयोजित केलेल्या बैठकीला काँग्रेस, डावे, आम आदमी पार्टीसह सर्व विरोधी पक्ष उपस्थित राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, शरद पवार हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याने विरोधी पक्ष राष्ट्रपती पदाचा उमेदवार शोधत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्याची शक्यता पडताळण्याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी बोलल्या आहेत.
...म्हणून पवार अनुत्सुक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, पवार साहेब हे राजकारणात सक्रिय आहेत. सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा त्यांचा विचार नाही. ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार नसतील. पराभवासाठी ते कधीच निवडणूक लढविणार नाहीत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमतासाठी 1500 मते कमी आहेत. बीजेडी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस आणि अन्य छोट्या पक्षांच्या भूमिकेचा अंदाज नसल्याने पवार जोखीम घेणार नाहीत.