भाजपा स्वबळावर लढू शकणार राष्ट्रपतिपदाची निवडणूक
By admin | Published: March 12, 2017 03:42 AM2017-03-12T03:42:08+5:302017-03-12T03:42:08+5:30
आणखी दोन राज्ये या पक्षाच्या झोळीत पडल्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली : आणखी दोन राज्ये या पक्षाच्या झोळीत पडल्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २५ जुलै रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या वारसदाराची निवड केली जाईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संख्याबळ, २९ राज्यांच्या विधानसभा, दिल्ली राजधानी क्षेत्र तसेच पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशातील सभागृह सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. सध्या भाजपाची महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश आणि आसाममध्ये सरकारे असून, जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेशमध्ये युती सरकारमध्ये हा पक्ष सहभागी आहे. उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यातील विजय भाजपासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कारण या राज्यातील मतांची किंमत सर्वाधिक आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आमदाराच्या एका मताची किंमत निवडून आलेले एकूण आमदार भागीले एक हजार एवढी असते. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वाधिक २१.७ कोटी एवढी आहे.