राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 01:34 PM2022-06-12T13:34:11+5:302022-06-12T13:37:26+5:30

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण असावा? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे.

Presidential Election: Uddhav Thackeray will be absent from the meeting called by mamata banerjee; Sharad Pawar may absent | राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय...

राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय...

googlenewsNext

राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली. यामुळे आता विरोधक आणि सत्ताधारी या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. असे असताना महाराष्ट्रातून काँग्रेसने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसविरोधात तिसरी आघाडीची मोट बांधण्यात पवारांसोबत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली आहे. 

या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण राहील? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आप नेते खासदार संजय सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.  खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

याचवेळी ममता यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपाविरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये दिल्लीत १५ जूनला ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे म्हटले आहे. टीएमसीने पाठविलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीमुळे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी तीन वाजता विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली असल्याचे म्हटले आहे. येचुरी यांच्यानुसार जर आधीच एक बैठक ठरलेली असेल तर शरद पवार ममतांच्या बैठकीला उपस्थित राहू शकतील की नाही हे देखील समजणार आहे. 

ममता यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र करण्याचा 'एकतर्फी' प्रयत्न नुकसानच करणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची १५ जून रोजी होणारी बैठक आधीच ठरलेली आहे, असे येचुरी यांनी म्हटले आहे. 

तर ममता यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहू शकणार नाहीत. आम्हाला ममता यांचे पत्र मिळाले आहे. परंतू आम्ही तेव्हा अयोध्येमध्ये असणार आहोत. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. या बैठकीला आमचा एक ज्येष्ठ नेता पाठवू, असे राऊत म्हणाले आहेत. 

विरोधकांची एकी? 
- राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून विरोधकांमध्ये एकमत होणार काय? याबद्दल अद्यापही ठोस काहीही सांगता येत नाही. विरोधकांची एकी हाेऊन
उमेदवारावरून एकमत व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु काँग्रेसच्या पुढाकारात आप, टीआरएस व टीएमसी पक्ष एकत्र येतील काय? हा मुख्य प्रश्न आहे. 
- टीएमसीचे लोकसभेत २३ व राज्यसभेत १३ सदस्ये आहेत. टीआरएसचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत ७ सदस्य आहेत. यापूर्वी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या बोलाविलेल्या अनेक बैठकांना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावलेली नाही.


 

Web Title: Presidential Election: Uddhav Thackeray will be absent from the meeting called by mamata banerjee; Sharad Pawar may absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.