राष्ट्रपती निवडणुकीचे मतदान १७ जुलै रोजी
By admin | Published: June 8, 2017 06:52 AM2017-06-08T06:52:01+5:302017-06-08T06:53:10+5:30
भारतीय प्रजासत्ताकाचे १५वे राष्ट्रपती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला
(लोकमत न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताकाचे १५वे राष्ट्रपती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीचे मतदान १७ जुलै रोजी होईल व गरज पडल्यास २० जुलै रोजी मतमोजणी होईल.
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे. त्याआधी एक आठवडा किंवा चार दिवस आधी मुखर्जी यांचा उत्तराधिकारी म्हणून देशाच्या या सर्वोच्चपदावर पुढील पाच वर्षे कोण बसेल हे स्पष्ट होईल. एकाहून जास्त उमेदवार रिंगणात नसतील, तर १ जुलै रोजीच नव्या राष्ट्रपतीचे नाव समोर येईल.
लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य तसेच सर्व राज्ये आणि दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे सदस्य या निवडणुकीसाठी मतदार असतील, यात संसद व विधानसभांमधील नामनिदर्शित सदस्यांचा समावेश नसेल. तसेच राज्य विधान परिषदांच्या सदस्यांनाही मतदानाचा अधिकार नसेल.
आयोगाने या निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव अनूप मिश्रा यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याखेरीज प्रत्येक राज्यात एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमला गेला आहे. महाराष्ट्रात राज्य विधिमंडळ सचिवालयाचे
प्रधान सचिव डॉ. ए. एन. कळसे व उपसचिव आर. जे. कुडतरकर हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
मतदान १७ जुलै रोजी स. १० ते सा. ५ या वेळात होईल. दिल्लीत संसद भवनाच्या खोली क्र. ६७ मध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य मतदान करू शकतील. मुंबईत विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावरील सेंट्रल हॉलमध्ये मतदान होईल. मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल. अपवादात्मक परिस्थितीत व पूर्वसूचना देऊन संसद सदस्य राज्यांमध्ये किंवा राज्य विधानसभांचे सदस्य दिल्लीमध्ये मतदान करू शकतील.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या अर्जावर किमान ५० सूचक व किमान पाच अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या लागतील. मतदार असलेले आमदार, खासदार सूचक व अनुमोदक असू शकतील. एकाहून अधिक उमेदवारांच्या अर्जांवर सूचक व अनुमोदकांच्या सामायिक स्वाक्षऱ्या असतील तर त्यापैकी जो अर्ज आधी दाखल होईल त्यावरील स्वाक्षऱ्या ग्राह्य धरल्या जातील. प्रत्येक उमेदवारी अर्ज फक्त दिल्लीतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावा लागेल.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना : १७ जून
उमेदवारी अर्जासाठी अखेरचा दिवस : २८ जून
अर्जांची छाननी : २९ जून
माघार घेण्यासाठी : १ जुलै
मतदानाचा दिवस : १७ जुलै
मतमोजणी : २० जुलै
मतदानासाठी खास पेन
मतदारांना मतपत्रिकेवर पसंतीची खूण करण्यासाठी आयोगाकडून खास पेन दिले जाईल व त्याच पेनाचा वापर करून त्यांना मतदान करावे लागेल. अन्य पेन वापरून मतदान केल्यास ते मत बाद ठरविले जाईल. मतदाराला मतदान कक्षात जाताना हे पेन उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्य निवडणक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांनी सांगितले.