दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 19:17 IST2020-01-13T19:13:48+5:302020-01-13T19:17:06+5:30
संसद हल्ल्यातही हात? अफजल गुरूने भर न्यायालयात सांगितले होते

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले
श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर स्ट्रॅटेजिक एंटी हायजॅकिंग टीममध्ये तैनात असलेला अधिकारी देविंदर सिंह याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा पोलिस अधिकारी डीएसपी दर्जाचा असून राष्ट्रपतींकडून वीरता पुरस्कारही मिळालेला आहे. या अधिकाऱ्याला दहशतवाद्यांसह त्याच्या कारमध्ये पकडण्यात आल्याने त्याला दहशतवाद्यांसारखीच वागणूक देण्यात येणार आहे.
11 जणांची हत्या करणारा दहशतवादी नवीद बाबा याच्यासोबत ताब्यात घेण्यात आलेल्या डीएसपी देविंदर सिंहचा वीरता पुरस्कार परत घेतला जाण्याची शक्यता आहे. याची माहिती गृह मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्याची आयबी, रॉ आणि लष्काराकडून चौकशी केली जाणार आहे. यानंतर एनआयए सिंह आणि नवीद यांना ताब्यात घेणार आहे.
देविंदरने दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी 12 लाख रुपयांची लाच घेतल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. देविंदर हा नवीद आणि आसिफ अहमद या दोन दहशतवाद्यांना चंदीगढला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी नेत होता. जेव्हा त्याची कार थांबविण्यात आली तेव्हा त्याची कार इरफान अहमद मीर हा चालवत होता. त्यांना कुलगामच्या हायवेवर रोखण्यात आले होते.
मीर हा पाचवेळा पाकिस्तानात जाऊन आलेला आहे. यामुळे हे दोघेही दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी किंवा परत जाण्यासाठी मदत तर करत नव्हते ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यांच्याकडे एक एके 47 रायफल, दोन पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त सापडले आहेत. तसेच सिंहच्या घरातून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत.
चौकशीमध्ये असे आढळून आले आहे की, सिंह गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद्यांना हिवाळ्यामध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम करत होता. यासाठी तो मोठी रक्कम घेत होता. सिंह नवीद आणि आसिफला घेण्यासाठी शोपिया जिल्ह्यामध्ये गेला होता, तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. हे दहशतवादी सिंह याच्या श्रीनगर येथील घरातही एक रात्र थांबले होते.
संसद हल्ल्यातही हात? अफजल गुरूने भर न्यायालयात सांगितले होते
सिंह याचे नाव याआधी संसद हल्ल्यातही घेतले गेलेले होते. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूने न्यायालयात सांगितले होते की, सिंह यांच्या आदेशावरूनच दिल्लीला पाठविण्यात आले होते. यावेळी दहशतवाद्यांची राहण्याची सोयही त्यानेत केली होती. तसेच एखादी वापरलेली अँबेसिडर कारही खरेदी करण्यास सांगितले होते. याच कारचा वापर संसद हल्ल्यासाठी करण्यात आला होता. मात्र, तेव्हा पोलिसांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते.