कुंभच्या भव्यतेला राजकीय दिव्यतेची जोड, राष्ट्रपती, पंतप्रधानांचेही दौरे, अनेक मान्यवरांची कुंभनगरीत हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:28 AM2019-02-06T05:28:54+5:302019-02-06T05:29:28+5:30
कुंभमेळ्यात साधुसंतांसोबतच भाविकांसाठीही उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा व एकूणच बडदास्त पाहता, या मेळ्याची भव्यता नजरेत भरत असतानाच त्याला आजवर कधीही लाभली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय दिव्यतेची जोड लाभून गेल्याचेही प्रकर्षाने दिसून येत आहे.
- किरण अग्रवाल
प्रयागराज - येथील कुंभमेळ्यात साधुसंतांसोबतच भाविकांसाठीही उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा व एकूणच बडदास्त पाहता, या मेळ्याची भव्यता नजरेत भरत असतानाच त्याला आजवर कधीही लाभली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय दिव्यतेची जोड लाभून गेल्याचेही प्रकर्षाने दिसून येत आहे.
येथील कुंभमेळ्याला राजसत्तेचे भरभक्कम पाठबळ लाभल्याचे दिसून येतेच, शिवाय केंद्रीय मंत्री निरंजना ज्योती यांचा महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेकही केला गेल्याने धर्म व राजसत्तेचे सहचर्य स्पष्ट होऊन गेले. त्यानंतर पहिल्याच शाही पर्वणीला केंद्रीय मंत्री निरंजना ज्योती यांच्यासह साध्वी उमा भारती व स्मृती इराणी यांनी स्नान केले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसे आयोजनाच्या प्रारंभापासूनच वैयक्तिक लक्ष पुरविले आहे; पण त्याखेरीज त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठकच येथे घेऊन समस्त मंत्रिगण व अधिकाऱ्यांना सरकारी खर्चाने कुंभस्नानाची संधी उपलब्ध करून दिली.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अन्य राज्यातील मुख्यमंत्री व मंत्र्यांनीही येथे हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले. लवकरच काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधीदेखील येणार आहेत म्हणे, त्यापार्श्वभूमीवर प्रियंका यांचे दुर्गावतारातील पोस्टर्सही प्रयागमध्ये झळकत आहेत. माध्यमांसाठीही ही बाब लक्षवेधी ठरत आहे.
सांप्रदायिकदृष्ट्या घडला इतिहास
प्रयागकुंभात अनेक ऐतिहासिक गोष्टी घडून येत आहेत, त्यात शाहीस्नानातील तृतीयपंथीयांच्या सहभागाखेरीज नाथपंथीयांचे शैवांसोबतच्या स्नानाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. काही दशकांपासून कुठल्याही कुंभात असे घडले नाही, शैव व वैष्णवांचे स्नान आटोपल्यानंतर नाथपंथीयांचे स्वतंत्र स्नान होत आले आहे; पण नाथ सांप्रदायाचे महंत असलेल्या योगीनाथ यांना प्रयागला शैव साधूंनी आपल्या हाताने स्नान घातले. अर्थात ते स्नान महंत योगीनाथ यांना होते की मुख्यमंत्र्यांना, हे संबंधितानाच ठाऊक. पण यानिमित्ताने एक सांप्रदायिक इतिहास घडला असे मात्र नक्की म्हणता यावे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्नीक हजेरी लावून प्रयागमेळ्याच्या दिव्यतेत मानाचा तुरा खोवला. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर कुंभात येणारे कोविंद हे दुसरे राष्ट्रपती ठरलेत. कुंभापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे येऊन कुंभाशी निगडित विविध कामांची लोकार्पणे व गंगा आरती केली होती.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत व शहरी विकासमंत्री मदन कौशिक यांनी २०२१मध्ये हरिद्वारला होणाºया कुंभाचे निमंत्रण साधुसंतांना देण्यासाठी येथे दौरा केला, तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्य व आचार्य किशोर व्यास यांच्या शिबिरांना भेटी दिल्या.
महाराष्ट्रात सुरक्षेचा बाऊ
आपल्याकडे महाराष्ट्रात सिंहस्थापूर्वी ध्वजारोहणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह तसेच त्यांच्यासोबत अन्य राजकीय मंडळी आल्याचा अपवाद वगळता कुणी मंत्री सिंहस्थाकडे फिरकले नव्हते; पण प्रयागला सर्रास राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात स्नानासाठी येत आहेत, त्यासाठी स्वत: राज्य सरकारनेच साºयांना निमंत्रणे धाडली आहेत. शिवाय या राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा यंत्रणांकडून कसलाही बाऊ केला जाताना दिसत नाही, हे विशेष.