एनआरसीप्रकरणी हस्तक्षेप करण्याची राष्ट्रपतींना विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:07 AM2018-08-10T04:07:23+5:302018-08-10T04:07:42+5:30
आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी केली.
नवी दिल्ली : आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी केली.
काँग्रेसचे नेते आनंद शर्मा, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, माकपचे मोहम्मद सलीम, जनता दल (सेक्यूलर)चे एच. डी. देवेगौडा, तेलुगू देसम पार्टीचे वाय. एस. चौधरी, आपचे संजय सिंग आदी नेत्यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. देशातील लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्ये केंद्र सरकार पायदळी तुडवत आहे. एनआरसीमधून ४० लाख भारतीय नागरिकांची नावे त्यामुळेच वगळण्यात आली, असा आरोप या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केला. त्यात पुढे म्हटले आहे की, एनआरसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल केंद्र सरकार दिशाभूल करणारी विधाने करीत आहे.
>चंडी यांचा आरोप
एनआरसीच्या मुद्द्यावरून भाजपा राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ओमन चंडी यांनी केला. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, एनआरसीबद्दल विरोधकांनी नोंदविलेल्या आक्षेपांकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. एनआरसीमधून वगळण्यात आलेले जे लोक देश सोडून जाणार नाहीत त्यांना गोळ्या घालून ठार मारा, असे आक्षेपार्ह वक्तव्य तेलंगणातील भाजपा आमदार टी. राजा सिंग यांनी ३१ जुलै रोजी केले होते. त्यांच्यावरही त्या पक्षाने अद्याप कारवाई केले नाही, असेही चंडी यांनी पुढे म्हटले आहे.