राष्ट्रपतींचा ताफा थांबवून त्याने रुग्णवाहिकेला दिले प्राधान्य!
By admin | Published: June 21, 2017 01:41 AM2017-06-21T01:41:16+5:302017-06-21T01:41:16+5:30
भरगच्च वाहतुकीच्या एका चौकात वाहतुकीचे नियंत्रण करताना राष्ट्रपतींच्या ताफ्याला थांबवून रुग्णवाहिकेस अग्रक्रम दिल्याबद्दल बंगळुरू वाहतूक पोलिसांतील एक उपनिरीक्षक
बंगळुरू : भरगच्च वाहतुकीच्या एका चौकात वाहतुकीचे नियंत्रण करताना राष्ट्रपतींच्या ताफ्याला थांबवून रुग्णवाहिकेस अग्रक्रम दिल्याबद्दल बंगळुरू वाहतूक पोलिसांतील एक उपनिरीक्षक एम. एल. निजलिंगप्पा यांचे सर्वदूर कौतुक होत आहे.
बंगळुरू मेट्रो ग्रीन लाइनचे उद््घाटन करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी शहरात आले होते. त्यांच्या मोटारींचा ताफा राजभवनाकडे जाणार म्हणून शहरातील रस्त्यांवरील वाहतूक रोखण्यात आली होती. उपनिरीक्षक निजलिंगप्पा ट्रिनिटी चौकात ड्युटीवर होते. अडवलेल्या वाहनांमध्ये एक रुग्णवाहिकाही अडकल्याचे त्यांना दिसली.
राष्ट्रपतींचा ताफा जाण्याची वाट न पाहता त्यांनी लगेच सहकाऱ्यांना पाठविले व रुग्णवाहिकेस वाट करून दिली. थांबविलेल्या वाहतुकीपैकी एका वाहनातील नागरिकाने ही घटना कॅमेऱ्यात टिपली व ती छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकली. त्यानंतर निजलिंगप्पांवर कौतुकाचा वर्षाव झाला. रविवारी त्यांचा खात्यातर्फे सत्कारही करण्यात आला. (वृत्तसंस्था)
वरिष्ठांनीही निजलिंगप्पा यांच्या माणुसकीची व प्रसंगावधानाची प्रशंसा केली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अभय गोयल यांनी निजलिंगप्पा यांना बक्षिशी देण्यात येत असल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले व नागरिकांनीही त्यांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल सूद यांनीही ‘वेल डन’असे टिष्ट्वट करून या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बक्षिसासाठी शिफारस केली.