पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावा अन्यथा पेट्रोल-डिझेल पुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:57 AM2018-08-28T07:57:36+5:302018-08-28T08:00:20+5:30
तेल कंपन्यांच्या सूचना; न केल्यास पुरवठा बंद करण्याचा इशारा
नवी दिल्ली : देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावावे, यासाठी पेट्रोल पंपांच्या मालकांवर दबाव येत असून, तसे न केल्यास त्यांचा पेट्रोल व डिझेलचा पुरवठा बंद करण्यात येईल, असे तेल कंपन्यांनी त्यांना कळविले आहे. कन्सॉर्टियम आॅफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष एस. एस. गोगी यांनीच हा आरोप केला आहे.
ते म्हणाले की, इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या तेल कंपन्यांतर्फे सर्व पेट्रोल पंपधारकांना पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे लावण्याच्या सूचना केल्या आहेत. कंपन्यांच्या योजनांच्या जाहिराती लावून त्यात मोदींचे छायाचित्र असावे, असे पंपधारकांना सांगण्यात आले. तसे न केल्यास ते पदार्थांचा पुरवठा बंद करू, असेही सांगत आहेत. पंतप्रधान उज्वला योजनेची जाहिरात करण्यास आम्ही त्यांना सांगितले आहे, असे इंडियन आॅइल कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही मोदी यांचे छायाचित्र लावण्यासाठी दबाव आणलेला नाही. पण योजनेच्या जाहितारातील मोदी यांचे छायाचित्र असणे अर्थातच स्वाभाविक आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.
कर्मचाºयांचीही माहिती हवी या आधी तेल कंपन्यांनी सर्व पेट्रोल पंपांवर काम करणाºया कर्मचाºयांची वैयक्तिक माहिती देण्यासाठी आग्रह धरला होता. कर्मचाºयाचे नाव, पत्ता, त्याचा धर्म, जात, शिक्षण, बँक खाते, मोबाइल क्रमांक, मूळ राज्य, तेथील गाव, ईमेल अॅड्रेस, आधार क्रमांक ही सर्व माहिती तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपधारकांकडून मागितली, अशी तक्रारही एस. एस गोगी यांनी केली. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीची खासगी माहिती मागणे वा देणे चुकीचे आहे. मात्र कौशल्य प्रशिक्षणासाठी आम्ही कर्मचाºयांची माहिती मागवली होती, अशी सारवासारव तेल कंपन्यांच्या अधिकाºयांनी केली.