खळबळजनक! कोरोना रुग्णांचे आकडे लपविण्यासाठी राज्यांचा दबाव; Thyrocare मालकाचा गंभीर आरोप
By हेमंत बावकर | Published: October 29, 2020 06:26 PM2020-10-29T18:26:42+5:302020-10-29T18:28:11+5:30
CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक दिवशीच्या कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्के घट झाली आहे.
राज्य सरकारांची बदनामी होईल या भीतीने कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी लपविण्याचे कृत्य करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअर (Thyrocare) ने केले आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी करण्यासाठी राज्य सरकारे दबाव आणत असल्याचा आरोप करत चाचण्या करण्यासही रोखले जात असल्याचे कंपनीचे सीईओ वेलुमनी यांनी केला आहे.
Thyrocare Technologies चे सीईओ वेलुमनी यांनी सांगितले की, काही राज्यांनी थायरोकेअरला सांगितले आहे की, कोरोनाच्या चाचण्या घेऊ नका. तर काही राज्यांनी कोरोना रुग्णांचे आकडे आयसीएमआरला देऊ नयेत किंवा त्यामध्ये हेराफेरी करावी, असे सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक दिवशीच्या कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्के घट झाली आहे. फाइनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार राज्य सरकारांनी कोरोनाची आकडेवारी कमी दाखविण्यासाठी चाचण्यांवर नियंत्रण ठेवले आहे.
त्यांनी सांगितले की, अनेक राज्यांनी थायरोकेअरला सांगितले आहे की कोरोना चाचण्या करू नयेत. तर काही राज्यांनी आयसीएमआरला अहवाल देण्यास मनाई केली आहे. तर काहींनी आकडे बदलण्यास सांगितले आहे. आम्ही आकडे सांगू तशीच आकडेवारी देण्यास बजावले आहे. थायरोकेअरद्वरे दोन महिन्यांपूर्वी दरदिवशी 7000 टेस्ट केल्या जात होत्या. ही संख्या आता घटून 2500 वर आली आहे.
दरम्यान, देशात कोरोना चाचण्यांची संख्या ही गेल्या महिनाभरात 9.4 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, याचवेळी गुजरात 15.2 टक्के, महाराष्ट्र 35.3, पंजाबमध्ये 15.3 टक्के आणि बिहारमध्ये 17.2 टक्के चाचण्यांच्या संख्येत घट झाली आहे. तर कर्नाटक 59.5 टक्के, केरळ 10.7 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 31.8 टक्के चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे.