तक्रार मागे घेण्यासाठी लैंगिक छळाच्या तक्रारीआधारे दबावाचा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:48 AM2021-03-12T05:48:46+5:302021-03-12T05:50:04+5:30
दिल्ली उच्च न्यायालय : खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची गरज
खुशालचंद बाहेती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आपल्याविरुद्धच्या तक्रारी परत घ्याव्यात म्हणून तक्रारदाराविरुद्ध विनयभंग, लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची वेळ आली आहे, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले
आहे.
दिल्ली उच्च न्यायालयासमोर दोन शेजाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले विनयभंग आणि लैंगिक छळाचे गुन्हे रद्द करण्याचे प्रकरण सुनावणीस होते. घरासमोर वाहन उभे करण्यावरून वाद सुरू झाला. पुढे बाचाबाची झाली व दोघांच्याही घरच्या महिलांनी पुरुषांविरुद्ध गुन्हे नोंदवले. नंतर काहींनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. यावेळी दोघांनीही गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे ठरल्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले. न्यायालयात दोघांनीही त्यांना चूक झाल्याचा पश्चाताप होत आहे आणि आता त्यांची एकमेकांविरुद्ध तक्रार राहिलेली नाही, असे सांगितले.
न्यायालयाने दोघांनी तडजोड केली असल्याने खटले चालवून उपयोग होणार नाही म्हणत याचिका मान्य केली. मात्र पोलीस आणि न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय झाला आहे, म्हणून दोघांनाही प्रत्येकी ३० हजार रुपये भरण्याचे आदेश दिले.
विनयभंग, लैंगिक छळाचे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत. ज्याच्याविरूद्ध असे आरोप होतात, त्यांच्या प्रतिमेस कायम तडा जातो. अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करणे हा न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग आहे.
- न्या. सुब्रोमण्यम प्रसाद,
दिल्ली उच्च न्यायालय.