खनिज तेलाचे भाव तीन वर्षे पडलेले राहतिल - मुकेश अंबानी
By Admin | Published: February 22, 2016 03:24 PM2016-02-22T15:24:32+5:302016-02-22T15:24:32+5:30
खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारात किमान तीन वर्षे घसरलेल्या राहतिल असा अंदाज मुकेश अंबानी यांनी वर्तवला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारात किमान तीन वर्षे घसरलेल्या राहतिल असा अंदाज मुकेश अंबानी यांनी वर्तवला आहे. अंबानी हे जगातला सगळ्यात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. बराच काळ तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत, आणि अशी स्थिती जगानं प्रथमच अनुभवली असल्याचं अंबानी यांनी सीएनएनच्या रफिक झकेरिया यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
याआधीही अनेकवेळा तेलाच्या किमतीत चढउतार झाले आहेत, परंतु केवळ पुरवठा वाढला म्हणून महिनोनमहिने तेलाचे भाव घसरले असं कधी झालं नाही असं अंबानी म्हणाले. अमेरिकेमध्ये या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान उदयाला आलं आणि प्रचंड प्रमाणात तेलउत्पादन झाल्यामुळेही ही परिस्थिती आल्याचं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेचं तेल उत्पादन प्रतिदिन एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी होतं, जे आता वाढून तब्बल नऊ दशलक्ष डॉलर्स प्रतिदिन झाल्याचं अंबानी म्हणाले.
त्यामुळे तेलाचं उत्पादन किती असावं यावर ओपेक देशांचं नियंत्रण राहिलं नसल्याकडे अंबानी यांनी लक्ष वेधलं आहे.
हा खनिज तेलाच्या घसरलेल्या भावांचा काळ किती लांबेल असं विचारला असता, तीन ते पाच वर्षे असं उत्तर त्यांनी दिलं, परंतु लगेचच, मी नेहमीच चुकीचा अंदाज सांगतो असं सांगत माझ्या मतावर विसंबून राहू नका असा सल्लाही त्यांनी दिला.
अर्थात, ही परिस्थिती भारताच्या पथ्यावर पडणारी असल्याचे अंबानी म्हणाले, भारत हा जगातला सगळ्यात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे. जे देश मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतात, त्यांचं विदेशी चलन कमी दरांमुळे वाचत आहे. यामुळे वित्तीय तूट कमी होण्यास तसेच उत्पन्न वाढण्यास सहाय्य होईल असं अंबानी म्हणाले.