डाळींची भाववाढ आता थांबणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:55 AM2023-09-27T07:55:01+5:302023-09-27T07:55:53+5:30
सरकारने अधिसूचनेद्वारे ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.
नवी दिल्ली : डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने तूर डाळ आणि उडीद डाळ यांच्या साठ्यावर घालण्यात आलेल्या मर्यादेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याशिवाय घाऊक व्यापारी (होलसेलर) आणि मोठ्या शृंखला (बिग चेन) यांच्या साठ्याच्या मर्यादेत कपात केली आहे. सरकारने यंदा २ जानेवारी रोजी डाळींवर साठे मर्यादा घातली होती. ही मुदत येत्या ३० ऑक्टोबरला संपणार होती. सरकारने अधिसूचनेद्वारे ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.
२०० नव्हे ५० मेट्रिक टन
मोठ्या शृंखला आणि घाऊक व्यापाऱ्यांची साठे मर्यादा आता ५० मेट्रिक टन करण्यात आली आहे. आधी ती २०० मेट्रिक टन होती. मिल मालकांची साठे मर्यादा मागील ३ महिन्यांतील उत्पादन अथवा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के, यापैकी जी अधिक असेल, तेवढी होती. ती आता घटवून मागील १ महिन्याचे उत्पादन अथवा वार्षिक क्षमतेच्या १० टक्के इतकी करण्यात आली आहे.