मोठा दिलासा! खाद्य तेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या नेमकं किती स्वस्त झालं तेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:50 PM2021-09-18T12:50:54+5:302021-09-18T12:52:00+5:30
Edible Oil Rate: खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Edible Oil Rate: खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या कर कपातीच्या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. याशिवाय घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घाण्यासाठीही सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. देशात आठ प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Prices of edible oils fall know how cheap mustard oil and other know the Details)
केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात १४ सप्टेंबर रोजी शेंगतेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लावर, पाम तेल, नारळ तेल आणि तिळाच्या तेलाच्या किमतीत घट नोंदविण्यात आली आहे. १४ सप्टेंब रोजी पाम तेलाचा दर २.५० टक्क्यांच्या घटीसह १२,३४९ रुपये प्रतिटन इतका नोंदवला गेला. एका आठवड्यापूर्वी हाच दर १२, ६६६ रुपये इतका होता.
तिळाच्या तेलाच्या दरात २.०८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर नारळ तेल १.७२ टक्क्यांनी स्वस्त झालं आहे. सनफ्लावर ऑइलचा १४ सप्टेंबर आधी १६,१७६ रुपये प्रतिटन इतका होता. आता त्यात १.३० टक्क्यांची घट झाली असून १५,९६५ रुपये प्रतिटन इतका झाला आहे. तेलाच्या घाऊक दरात झालेल्या घटीचे पडसाद किरकोळ बाजारातही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.
नियंत्रण आणि नजर ठेवण्यासाठी वेब पोर्टल
तेलाची साठेबाजी टाळण्यासाठी आणि मागणीची पूर्तता होण्यासाठी केंद्रानं खाद्य तेलाच्या आयात शुल्कात कपातीचा निर्णय घेतला होता. तसंच साठेबाजीला आळा घालण्यासाठी देखील अनेक महत्त्वाची पावलं सरकारनं उचलली आहेत. यात तेल निर्मात्या कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्या जवळील तेलाच्या स्टॉकची माहिती एका वेब पोर्टलवर नोंद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय घाऊक विक्रेत्यांना तेलाच्या किमती स्पष्ट स्वरुपात दिसतील अशा पद्धतीनं जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार खरेदी करता येईल.