चंदीगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांचा गौरव
By Admin | Published: April 22, 2016 03:00 AM2016-04-22T03:00:38+5:302016-04-22T03:00:38+5:30
चंदीगडचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरचे सुपुत्र अजित जोशी यांना जनधन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्कार देउन पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : चंदीगडचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरचे सुपुत्र अजित जोशी यांना जनधन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्कार देउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी गौरवण्यात आले. अजित जोशी हे २00३ च्या भारतीय प्रशासकीय तुकडीतील अधिकारी असून, ते हरयाणा केडरमध्ये आहेत. राष्ट्रीय स्तरावर लोक प्रशासनात उत्कृष्ट व नावीन्यूपर्व कामगिरी करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी होणाऱ्या नागरी सेवा दिनी गौरवण्यात येते.
जोशी यांनी प्रभावी प्रचार व प्रसार यंत्रणा राबवून मुदतीपूर्वीच जनधन योजनेची २ लाख २0 हजार खाती उघडली. अटल पेन्शन योजना व अन्य योजना यांना जनधन योजनेशी जोडून दीड लाख लोकांना विमा कवच मिळवून दिले. तसेच खातेदाराच्या मृत्यूनंतर २१ दिवसांच्या आत विम्याची रक्कम त्याच्या नातेवाईकांना मिळवून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभी केली.
पानिपत येथे काम करीत असताना हरयाणा व महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी त्यांनी पानिपत महोत्सव सुरू केला. तसेच मोहाना येथील दलित हत्याकांडाच्या वेळी त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. झज्जर येथे काम करीत असताना वीटभट्ठ्यांवरील मुलांसाठी भट्टीशाळा योजनाही त्यांनी राबवली होती. त्याबद्दल तत्कालिन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी त्यांचे कौतुक केले होते. सोनीपतमधील लोकांच्या मदतीने त्यांनी बिहारमधील कोसी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मुसहेरी या महादलितांच्या गावाचे पुनर्वसन करून, त्या गावाला विकासाचा मार्ग दाखवला होता. त्याबद्दल हरयाणाचे तेव्हाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अजित जोशी यांना शाबासकी दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)