पर्यावरण संवर्धनाबद्दल लोकमतचा गौरव, ‘इंडिया आय’चा लोकजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 05:02 AM2018-06-07T05:02:34+5:302018-06-07T05:15:37+5:30
पर्यावरण संरक्षणासाठी केवळ झाडे लावून भागणार नाही, झाडे जगविण्याची व संरक्षणाची जबाबदारीदेखील आपल्यालाच पार पाडावी लागेल, अशी भावना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली : पर्यावरण संरक्षणासाठी केवळ झाडे लावून भागणार नाही, झाडे जगविण्याची व संरक्षणाची जबाबदारीदेखील आपल्यालाच पार पाडावी लागेल, अशी भावना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी व्यक्त केली.
'इंडिया आय इंटरनॅशनल ह्युमन राईट्स आॅब्झर्व्हर’ने पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर इंडिया आयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा, अध्यक्ष राकेश गर्ग व डिव्हाईन शक्ती फाऊंडेशनच्या प्रमुख साध्वी भगवती सरस्वती उपस्थित होत्या.
विकासाच्या गतीमुळे पर्यावरण संरक्षणाची हाक लोकांपर्यंत पोहोचत नाही, अशी खंत व्यक्त करून राकेश शर्मा म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मानवी स्वभाव असाच बनत चालला आहे. त्यामुळे आज आपल्याला स्वच्छ हवेसाठी झगडावे लागते आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये तर स्वच्छ हवा असण्याच्या दिवसाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी दिल्लीतल्या घराघरात जाऊन कापडी, कागदी पिशव्या वाटणार असल्याची घोषणा शर्मा यांनी केली.
साध्वी भागवती सरस्वती म्हणाल्या, कागदांवर, बैठकांमध्ये पर्यावरण रक्षणाची केवळ चर्चा होते. आता प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याची वेळ आली आहे. प्रामाणिक प्रयत्न त्यासाठी करावे लागतील.
विजय दर्डा यांचा सत्कार
लोकमत वृत्तपत्र समूहाने नेहमीच सामाजिक जबाबदारी निभावली आहे. दै. लोकमतच्या १३ आवृत्त्या पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करूनच छापल्या जातात. वर्तमानपत्र छापण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची मोठी बचत त्यामुळे होते. प्रदूषणालाही आपोआप आळा बसतो. पर्यावरण संवर्धनात लोकमतने बजावलेल्या भरीव योगदानाबद्दल लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांचा इंडिया आय आयएचआरओचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा यांनी बुधवारी शाल, चषक, प्रमाणपत्र आणि रोपटे देऊन सत्कार केला. मंगळवारी पर्यावरणदिनी झालेल्या कार्यक्रमात खासदार विजय दर्डा यांच्यावतीने सहायक व्हाईस प्रेसिडेंट(जाहिरात) आशिष भाटिया यांनी सत्कार स्वीकारला होता.
यांचा झाला सत्कार
इंडिया आय इंटरनॅशनल ह्युमन राईट्स आॅब्झरर्व्हर संस्थेच्यावतीने . जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी बहुमोल योगदान देणाºया संस्था, व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यात मदुराईच्या थैगारजार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन प्रा. राजगोपालन वासुदेवन, अध्यात्मिक गुरू महामंडलेश्वर मार्तंडपुरी महाराज, हिमायलीन पर्यावरण व संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल प्रकाश जोशी, चित्रपट निर्माते नीला माधब पांडा, पर्यावरण पत्रकार निवेदिता खांडेकर, सोनिपतच्या बीपीएस महिला विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. वीना शर्मा, चेन्नईच्या एनव्हॉयर्नमेंटालिस्ट फाऊंडेशनचे संस्थापक अरूण कृष्णमूर्ती, अर्थ सेव्हीअर्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी कालरा, गीली मिट्टी फाऊंडेशनचे सदस्य ओशो कालिया यांचा समावेश होता.