जळगाव अपघाताची पंतप्रधानांकडूनही दखल, मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:25 PM2021-02-15T16:25:02+5:302021-02-15T16:52:56+5:30
PM Modi Condoles Loss Of Lives In Jalgaon Road Accident : जळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.
जळगाव - तालुक्यातील अभोडा, केर्हाळे, विवरे, रावेर येथील हातावर पोट असलेले मजूर बायका पोरांसह धुळे जिल्ह्यातील शहादा तालूक्यात पपई भरून आणण्याच्या हातमजुरीसाठी नेहमीप्रमाणे जात असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एक दाम्पत्य, तीन कुटूंबातील मायलेकी व मायलेकांसह ११ जण अभोडा येथील, दोन रावेर तर केर्हाळे व विवरे येथील एकेक जण असे एकूण १५ जण पपईने भरलेला ट्रक किनगावनजीक पलटल्याने आज पहाटे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सर्वत्र हाहाकार उडवणाऱ्या या घटनेने अभोडा, विवरे, केर्हाळे व रावेर शहरासह तालूक्यात एकच शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray या घटनेची दखल घेत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना मदत जाहीर केलीय. ( PM Modi Condoles Loss Of Lives In Jalgaon Road Accident )
जळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi म्हटलंय. तसेच, या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत, पंतप्रधान सहायता निधीमधून जाहीर करण्यात आली आहे. तर, गंभीर जखमींना 50 हजारांची मदतही देण्याचं पीएमओ कार्यालयाने सांगितलंय.
PM Narendra Modi has approved an ex-gratia of Rs. 2 lakhs each from Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to the tragic truck accident in Jalgaon, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured: PMO https://t.co/y0Zecy6SJ7
— ANI (@ANI) February 15, 2021
मुख्यमंत्र्यांकडूनही मदत जाहीर
मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करुन मृतांच्या वारसांना सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली असून संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 15, 2021
धुळे जिल्ह्यातील शहादा येथे पपई भरून आणण्याच्या हातमजूरीसाठी गेलेल्या तालुक्यातील हे मजूर रविवारी ट्रकमध्ये पपई भरून रावेरला आणत असताना क्रूर नियतीने झडप घालून यावल तालुक्यातील किनगावजवळ बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने अभोडा येथील एकाच आप्तपरिवारातील ११ जणांवर झडप घातल्याने अभोडा गावावर शोककळा पसरली.
याशिवाय अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 15, 2021
मृतांची नावे
मृतांमध्ये अशोक जगन वाघ (वय ४०), संगिता अशोक वाघ (वय २५) या दाम्पत्यासह त्यांची लहानगा मुलगा सागर अशोक वाघ (वय ०३ वर्षे)व नरेंद्र वामन वाघ (वय २५) हे एकाच परिवारातील चार सदस्य कमलाबाई रमेश मोरे (वय ४५) यांची शारदा रमेश मोरे (वय १५) व गणेश रमेश मोरे (वय ०५) वर्षे ही दोन्ही मुल मुली , संदीप युवराज भालेराव (वय २५) व दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) हे दाम्पत्य, सबनूर हूसेन तडवी (वय ५३) व दिलदार हुसेन तडवी (वय २०) हे मायलेकांसह रावेर येथील शेख हुसेन शेख मण्यार फकीरवाडा रावेर, डिगंबर माधव सपकाळे वय ५५ रावेर, केर्हाळे येथील सर्फराज कासम तडवी वय ३२ व संदीप युवराज भालेराव विवरे अशी १५ जण जागीच ठार झाल्याने एकच शोककळा पसरली असून, अभोडावासीयांची साखरझोपेतील झोप उडाली असून मुखशुद्धीसह चहापाणीसाठी आज पहाटे गावात एकही चूल पेटली नाही.
उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक
जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहसंवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पोलिस, मदत पथकाचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.