बिहारच्या गया मतदरासंघात मांझींसाठी पंतप्रधान उतरले प्रचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:53 AM2024-04-13T06:53:07+5:302024-04-13T06:54:05+5:30
माजी मुख्यमंत्री व माजी मंत्र्यांची हायप्राेफाईल लढत होणार चुरशीची
राजेश शेगाेकार
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बुद्धभूमी म्हणून विख्यात असलेल्या गया मतदारसंघात हाय प्राेफाईल लढत हाेत आहे. एनडीएमध्ये हम म्हणजेच हिंदुस्थान अवाम मोर्चाला केवळ एक जागा मिळाली असून या जागेवर माजी मुख्यमंत्री जतीनराम मांझी हे रिंगणात आहेत. दाेन पराभव पत्करल्यानंतर आता त्यांची तिसऱ्यांदा अग्नीपरिक्षा आहे. महागठबंधन मधून राजदचे माजी मंत्री कुमार सर्वजीत रिंगणात आहेत. त्यांचे वडील राजेश कुमार यांनी १९९१ मध्ये याच मतदारसंघात माझी यांना पराभूत केलेे हाेते हे विशेष.
येथे सर्वाधिक मतदार मांझी समाजाचे आहेत त्यामुळे मांझी समाजाचे उमेदवार विजयी होत आले आहेत. जदयुचे विजय मांझी विद्ममान खासदार आहेत तर भाजपाचीही ताकद माेठी आहे त्यामुळे राजद समाेर एनडीचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. स्व:ता माेदी मांझी यांच्यासाठी १६ एप्रिलला रॅली करत आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
पर्यटन आणि तीर्थयात्रेचे आंतरराष्ट्रीय स्थळ असूनही, विकासाचा अभाव,
गरिबी, बेरोजगारी तसेच शहरीकरणाच्या समस्यांवर मात करता आलेली नाही. शेती आणि लघु व्यापार हेच उत्पन्नाचे सर्वाधीक स्त्राेत आहे त्याकडे दुर्लक्ष
शेरघाटी, बाराछत्ती आणि बोधगया
असे अनेक भाग नक्षलग्रस्त आहेत नक्षलवाद कमजाेर झालेला नाही डोभी-पाटणा चौपदरीकरण. विअर धरण, विमानतळ विस्तारीकरण, उत्तरन प्रकल्पाच्या कामांची मागणी आहे
गया तिलकुटसाठी (तीळपट्टी) प्रसिद्ध आहे.मात्र कापड गिरणी, साखर कारखाने बंद,आरोग्य आणि शिक्षणाची स्थिती गंभीर आहे. मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अनेक घोषणा प्रत्यक्षात आल्या नाहीत
काँग्रेसने या मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवला; डेमोक्रॅटिक सोशालिस्ट पार्टी,जनसंघ,जनता पक्ष,राजद एकदा,जनता दल व भाजप चार वेळा जिंकलेआहे.