भारताच्या पंतप्रधानांनीही पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलं होतं 5 हजार रुपयांचं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 09:22 AM2018-02-21T09:22:29+5:302018-02-21T09:42:47+5:30
पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी भविष्यात ते पैसे परत करेल किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही.
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी भविष्यात ते पैसे परत करेल किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही. पण याच पंजाब नॅशनल बँकेकडून भारताच्या एका पंतप्रधानांनी कर्ज घेतले होते. भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सुद्धा पंजाब नॅशनल बँकेकडून गाडी घेण्यासाठी पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. लाल बहादूर शास्त्री यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून या कर्जाची परतफेड केली होती.
लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनी ही माहिती दिली. हे कर्ज का घ्यावे लागले त्याची आठवण सांगताना अनिल शास्त्री म्हणाले कि, आम्ही सेंट कोलंबो शाळेत होते. त्यावेळी आम्ही टांग्याने शाळेत जायचो. एकदा आम्ही शाळेत जाण्यासाठी सरकारी गाडी वापरली. पण नियमितपणे खासगी कामांसाठी सरकारी गाडी वापरायला माझ्या वडिलांची परवानगी नव्हती. त्यावेळी आपल्याकडे स्वत:ची गाडी असावी अशी कुटुंबियांची इच्छा होती. घरात गाडी घेण्याची मागणी सुरु होती.
ते 1964 चे वर्ष होते. त्यावेळी शास्त्रीजींचे सहाय्यक व्ही.एस.वेंकटरामन यांनी चौकशी केल्यानंतर समजले कि, फियाट गाडीची किंमत 12 हजार रुपये आहे. त्यावेळी कुटुंबाकडे फक्त 7 हजार रुपये होते. शास्त्रीजींनी पंजाब नॅशनल बँकेकडे 5 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. लगेच त्याचदिवशी कर्ज मंजूर झाल्याची आठवण अनिल शास्त्री यांनी सांगितली.
गाडी घेतल्यानंतर दोनच वर्षांनी 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद येथे परिषदेसाठी गेलेल्या शास्त्रीजींचे अचानक निधन झाले. त्यावेळी आम्ही घेतलेल्या पाच हजार रुपयाच्या कर्जाची परतफेड झाली नव्हती. माझ्या आईने तिला मिळणाऱ्या पेन्शनमधून हे कर्ज फेडले असे अनिल यांनी सांगितले. क्रिम रंगाची ही कार फियाटचे 1964 सालचे मॉडेल आहे. DLE 6 असा या गाडीचा नंबर होता. मोतीलाल नेहरु मार्गावर असलेल्या लाल बहादूर शास्त्री स्मारकात आता ही कार ठेवण्यात आली आहे. 1894 साली स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक नीरव मोदीने केलेल्या 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळयामुळे चर्चेत आहे.