नवीन संसद भवनाचा पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी समारंभ डिसेंबरमध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 04:12 AM2020-11-26T04:12:35+5:302020-11-26T04:13:14+5:30
अद्याप अधिकृत घोषणा नाही; राजपथाचाही विकास होणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा पायाभरणी समारंभ येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
संसद परिसरात असलेले महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पाच महनीय व्यक्तींचे पुतळे नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरू झाले की, तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर हे पुतळे संसद संकुलात पुन्हा बसविण्यात येतील. सध्याच्या संसद भवनाशेजारीच नवे संसद भवन बांधण्यात येईल. हे काम सुरू झाल्यापासून २१ महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. संसद भवन व परिसराच्या विकास योजनेत राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेटपर्यंत ३ कि.मी. लांबीच्या राजपथाचे रंगरूपही बदलण्यात येणार आहे. नव्या संसद भवनाचा पायाभरणी समारंभ १० डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
तेव्हा ८३ लाख, आता ८६१ कोटी!
नवीन संसद भवनाची बांधणी व परिसराच्या विकासाला ८६१.९० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्याच्या संसद भवनाचा आराखडा ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटन्स व हर्बर्ट बेकर यांनी तयार केला होता. या संसद भवनाचा पायाभरणी समारंभ १२ फेब्रुवारी १९२१ साली झाला व इमारतीचे काम त्यानंतर सहा वर्षांनी पूर्ण झाले. त्यासाठी ८३ लाख रुपये खर्च आला होता.