पंतप्रधान मोदी आणि सुषमा स्वराजांचे लोकसभेत हार्दिक स्वागत

By admin | Published: March 15, 2017 08:30 PM2017-03-15T20:30:09+5:302017-03-15T20:30:17+5:30

उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी

Prime Minister Modi and Sushma Swaraj are warmly welcomed in the Lok Sabha | पंतप्रधान मोदी आणि सुषमा स्वराजांचे लोकसभेत हार्दिक स्वागत

पंतप्रधान मोदी आणि सुषमा स्वराजांचे लोकसभेत हार्दिक स्वागत

Next

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी लोकसभेत जयश्रीराम, हरहर मोदी घरघर मोदी, भारत माता की जय घोषणा देत, बाके वाजवीत जोरदार स्वागत केले. किडनीच्या आजारपणानंतर दीर्घकाळाने सभागृहात परतलेल्या सुषमा स्वराज यांचे सर्वपक्षिय सदस्यांनी तितक्याच उत्साहाने स्वागत केले.
निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान बुधवारी प्रथमच लोकसभेत येताच भाजपचे सारे सदस्य जागेवर उठून उभे राहिले. उत्तरप्रदेश व उत्तराखंडाच्या जोडीला मणिपूर आणि गोव्यातही भाजपचेच सरकार स्थापन होत असल्याने सत्ताधारी बाकांवर प्रचंड उत्साह संचारला होता. पंतप्रधानांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा संचार मंत्रालयाशी संबंधित प्रश्नोत्तरे सुरू होती. तथापि सत्ताधारी सदस्यांमधे अचानक पंतप्रधानांच्या स्वागताचा जोश संचारल्यामुळे काही क्षण कामकाज स्तब्ध झाले. सत्ताधारी सदस्यांच्या जोडीला बीजू जनता दलाचे जे. पांडाही बाके वाजवतांना दिसले तर टीआरएसच्या जितेंद्र रेड्डींनी पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाउन त्यांचे अभिनंदन केले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच साऱ्या सभागृहाने सुषमा स्वराजांचे हार्दिक स्वागत केले. स्वराजांचे स्वागत करतांना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दीर्घकाळानंतर सभागृहात तुमचा आवाज दुमदुमतो आहे ही आनंदाची बाब आहे. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. स्वागताचा स्वीकार करतांना सुषमा स्वराजांनी तमाम सदस्यांचे आभार मानले. भगवान कृष्णाची आपल्यावर कृपा असल्यामुळेच या आजारातून मी सुखरूप बाहेर आले असेही त्या म्हणाल्या.
अमेरिकेत मूळचे भारतीय असलेल्या नागरीकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत केंद्र सरकार गप्प का बसले आहे? या आरोपाचे जोरदार खंडन करतांना सुषमा स्वराज म्हणाल्या, अमेरिकेत भारतीय मूळाच्या नागरिकांची सुरक्षितता हा केंद्र सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. अमेरिकेत ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबियांनीही सरकारवर असा आरोप केलेला नाही. भारत सरकार अमेरिकन सरकारशी सातत्याने संवाद साधून आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील भारतीय समुदाय आणि भारत सरकारच्या दूतावासाशी देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय नियमितपणे संपर्कात आहे. परदेशस्थ भारतीयांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार सतर्क असून आवश्यक ती सारी कार्यवाही सरकार करील, अशी ग्वाही स्वराज यांनी लोकसभेत दिली.
गोवा आणि मणिपूरमधे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण दिले नाही. पक्षाची बाजूही ऐकली नाही. याचा निषेध करीत काँग्रेस सदस्य घोषणा देत वेलमधे आले. या गोंधळात राज्यसभेचे कामकाज तीनदा तहकूब झाल्यानंतर अंतत: दिवसभरासाठी तहकूब झाले. 

Web Title: Prime Minister Modi and Sushma Swaraj are warmly welcomed in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.