विद्यापीठात पिण्यास पाणी नसल्याने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली विद्यार्थ्यांपुढे दिलगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:36 AM2018-05-26T00:36:03+5:302018-05-26T00:36:03+5:30
विश्वभारतीचा दीक्षान्त समारंभ; बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याही उपस्थित
कोलकाता : शांतिनिकेतनमध्ये विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या समस्येची दखल घेऊ न, आपल्या भाषणात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बंगाली भाषेत मोदींनी भाषणाची सुरुवात करून पंतप्रधान म्हणाले की, मी येत असताना काही विद्यार्थ्यांनी पाण्याच्या समस्येविषयी हातवारे करून सांगितले. याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, असे मोदी म्हणाले. दिलगिरी व्यक्त करताना त्यांचा टोला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना असावा, याची चर्चा सुरू होती.
मोदी म्हणाले की, मी येथे पाहुणा म्हणून नव्हे, तर या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आलो आहे. विद्येसाठी आपण गुरूंकडे जायचे असते, अशी आपली संस्कृती सांगते. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे पावन झालेल्या या विद्यापीठात शिक्षकांच्या उपस्थितीत वेळ घालवण्याची संधी मला मिळत आहे. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या समारंभास राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी व मुख्यमंत्री ममत बॅनर्जी हेही उपस्थित होते.
बांग्ला भवनचे उद्घाटन
या समारंभाला बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होता. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एका विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला दोन पंतप्रधानांनी उपस्थित राहणे, पहिल्यांदाच घडले असेल. दोन्ही पंतप्रधानांनी बांग्ला भवनाचेही उद्घाटन केले.
मोदींनी दाखवला ममतांना मार्ग
पंतप्रधान हेलिकॉप्टरने पोहोचले, तेव्हा राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. ममता बॅनर्जी घाईघाईने तिथे येत होत्या. पण त्या रस्त्यात चिखल होता. त्यामुळे या रस्त्याने या असे मोदी यांनी हाताने खुणा करून मुख्यमंत्र्यांना सांगितले.
टागोर व महात्मा गांधी यांचा आवर्जून उल्लेख
या भूमीला गुरूदेवांच्या पायाचा स्पर्श झाला आहे. कधी तरी त्यांनी येथेच महात्मा गांधी यांच्याशी चर्चाही केली आहे. त्या दोघा महापुरुषांमध्ये काय चर्चा झाली असेल, याचा विचार इथे येताना मी करीत होतो, असे ते म्हणाले.