आईला मुखाग्नी देताच पंतप्रधान पुन्हा कार्यरत; ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दाखवला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:29 AM2022-12-31T06:29:08+5:302022-12-31T06:31:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांच्या अंत्यसंस्कारानंतर सुमारे दोन तासांतच आपले दु:ख दूर सारून निर्धारित कार्यक्रमांना व्हर्च्युअली हजेरी लावली.
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आई हीराबेन यांना मुखाग्नी देत आई गेल्याचा शोक आवरत पुन्हा जनतेच्या सेवेसाठी कार्यरत झाले. मोदी यांनी शुक्रवारी हावडा ते न्यू जलपायगुडी या पश्चिम बंगालमधील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला.
प. बंगालसाठी चार रेल्वे प्रकल्पांचा प्रारंभ आणि न्यू जलपाईगुडी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी करणाऱ्या पंतप्रधानांनी न्यू जलपाईगुडीसह रेल्वेस्थानकांचा विमानतळांच्या धर्तीवर विकास केला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग म्हणून सुमारे १२० कोटी रुपये खर्चून हुगळी नदीखाली बांधला जाणारा भारतातील पहिला बोगदा प्रवाशांना ४५ सेकंदांचा थरारक अनुभव देतो. या बोगद्याचा ५२० मीटरचा पल्ला मेट्रो ४५ सेकंदांत पार करणार आहे. हा बोगदा युरोस्टारच्या लंडन-पॅरिस कॉरिडॉरची भारतीय आवृत्ती आहे.
ममता बॅनर्जी बसल्या प्रेक्षकांसह खुर्चीवर
- हावडा रेल्वेस्थानकावर भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिला.
- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यांनी प्रेक्षकांसह खुर्चीवर बसणे पसंत केले.
दु:ख दूर सारून मोदी कामात व्यस्त...
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांच्या अंत्यसंस्कारानंतर सुमारे दोन तासांतच आपले दु:ख दूर सारून निर्धारित कार्यक्रमांना व्हर्च्युअली हजेरी लावली. प. बंगालमधील पहिल्या ‘वंदे भारत ट्रेन’ला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘तुमची आई, आमची आई...देव तुम्हाला तुमचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे बळ देवो. मी तुम्हालाही थोडी विश्रांती घ्या,’ अशी विनंती केली. यावेळी मोदी यांनी वैयक्तिक कारणांमुळे कार्यक्रमाला प्रत्यक्षात येऊ शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
बंगालच्या जनतेच्या वतीने ममता यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मोदींनी शुक्रवारी बंगालमध्ये ७,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. यामध्ये कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाइनच्या जोका-तरातला टप्प्याचे उद्घाटन आणि राज्यातील चार रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. बंगालमधील ईशान्येकडील सर्वांत मोठ्या स्थानकांपैकी एक असलेल्या न्यू जलपाईगुडी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचा मोदींनी शुभारंभ केला. राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनअंतर्गत ९९० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात सीवरेज पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"