पंतप्रधान मोदींनी आता स्वत:च्या देशातही फिरायच नाही! चीनने घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 04:32 PM2018-02-15T16:32:46+5:302018-02-15T16:39:50+5:30
सीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. त्यावर चीनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा पूर्वीपासून दावा आहे. त्यामुळेच चीनने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या या दौ-याविषयी आपण भारताकडे राजनैतिक निषेध नोंदवणार असल्याचे चीनने म्हटले आहे.
चीन-भारत सीमा प्रश्नावर आमची भूमिका स्पष्ट आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशला चीन सरकारने मान्यता दिलेली नाही. तिथल्या वादग्रस्त भागात भारतीय नेत्यांच्या दौ-याला आमचा विरोध कायम आहे असे शिनुहा वृत्तसंस्थेने गेंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असून काही मुद्यांवर एकमत झाले आहे असे गेंग यांनी सांगितले. सीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा, कटिबद्धता दाखवा अशी विनंती चीनने केली आहे.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारतानेही सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी त्यांनी केली. भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौ-यावर चीन नेहमीच आक्षेप नोंदवला आहे. दलाई लामा यांनी मागच्यावर्षी अरुणाचलचा दौरा केला त्यावेळी चीन प्रचंड संतापला होता. रोज चीनकडून भारताला इशारे दिले जात होते. अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा पूर्वीपासून दावा आहे.