राष्ट्रगीत सुरू असतानाही चालत राहिले पंतप्रधान मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2015 09:00 AM2015-12-24T09:00:30+5:302015-12-24T09:03:31+5:30
राष्ष्ट्रगीत सुरू असतानाही अनावधानाने चालतच राहिल्याने रशिया दौ-या-या सुरूवातीलाच पंतप्रधान मोदींना विचित्र स्थितीचा सामना करावा लागला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - दोन दिवसांच्या रशिया दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दौ-याच्या पहिल्याच दिवशी विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. मॉस्को येथे पंतप्रधान मोदी दाखल झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी सलामी दिल्यानंतर रशियन अधिकाऱ्याने मोदींना पुढे चालण्याची सूचना दिली. मात्र ते पुढे चालत असताना त्याच क्षणी भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले. तेव्हा रशियन अधिकारी आपापल्या जागीच थांबले, पण मोदी मात्र चालतच राहिले. ते बरीच पावलं पुढे गेल्यावर एका रशियन अधिका-यांना मागून येऊन त्यांचा हात पकडून त्यांना थांबवले व पुन्हा निर्धारित जागेवर आणले.
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करतानाच विदेशात जास्त फिरल्यामुळे पंतप्रधान मोदी राष्ट्रगीताची धूनही विसरले आहेत, अशी टीका केली.
मोदी यांचे बुधवारी रात्री उशिरा मॉस्को येथे आगमन झाले. मोदींच्या या दोन दिवसांच्या रशिया दौ-यादरम्यान आर्थिक, अणुऊर्जा, हायड्रोकार्बन आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे करार मार्गी लागणार आहेत. हा दोन दिवसीय दौरा ऐतिहासिक असून तो छोटा असला तरी महत्वपूर्ण आहे, असे ट्विट मोदी यांनी दौ-यावर रवान होण्यापूर्वी केले. रशिया हा भारताचा जुना व घनिष्ट मित्र आहे, असेही त्यांनी नमूद केले.