पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वस्त विमान सेवा ‘उडान’चा शुभारंभ
By admin | Published: April 28, 2017 02:00 AM2017-04-28T02:00:57+5:302017-04-28T02:00:57+5:30
दिल्ली- सिमला एवढ्या अंतराच्या उडान या स्वस्त हवाई सफरीचे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचबरोबर
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
दिल्ली- सिमला एवढ्या अंतराच्या उडान या स्वस्त हवाई सफरीचे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचबरोबर नांदेड- हैदराबाद व कडप्पा- हैदराबाद मार्गावरील उडानच्या पहिल्या उड्डाणांनाही व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात आला. प्रादेशिक हवाई संपर्क योजनेद्वारे भारतात सामान्य माणसाचे स्वस्त हवाई सफरीचे स्वप्न पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे. दिल्ली- सिमला उड्डाणामुळे हिमाचल प्रदेशच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. यापुढे पायात हवाई चप्पल घालणाऱ्या प्रवाशांनादेखील देशाच्या विविध भागांत हवाई सफरीचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी केले.
सप्टेंबर २0१७ पर्यंत प्रादेशिक हवाई संपर्क योजनेद्वारे देशातल्या ४५ विमानतळांवर टप्प्याटप्प्याने स्वस्त प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर कोल्हापूर, जळगाव विमानतळांवर सप्टेंबर २0१७ मधे छोट्या विमानांद्वारे या योजनेचा प्रारंभ होईल. याखेरीज मुंबई-पोरबंदर, मुंबर्ई-कांडला हवाई वाहतूकदेखील याच सुमारास सुरू होणार आहे.
केंद्र सरकारने १५ जून २0१६ रोजी राष्ट्रीय नागरी उड्डाण धोरण (एनसीएपी) जाहीर केले. या धोरणानुसार खाजगी विमान कंपन्यांना फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट विमानांद्वारे ५00 किलोमीटर्सची १ तासाची हवाई सफर अथवा हेलिकॉप्टरद्वारे अर्ध्या तासाच्या हवाई प्रवासासाठी फक्त २,५00 रुपये आकारण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या धोरणानुसार देशातील ४५ विमानतळे ज्यांचा सध्या कमीत कमी अथवा नगण्य वापर आहे, त्यांचा प्रादेशिक हवाई संपर्क योजनेच्या व्यापक आराखड्यात समावेश करण्यात आला.
केवळ २,५00 रुपयांच्या रकमेत खाजगी हवाई वाहतूक कंपन्या ही सेवा प्रदान करणार आहेत. या विमान कंपन्यांवर छोट्या अंतराच्या विमानसेवेखेरीज किमान ५ व अधिकतम १३ हेलिकॉप्टर्सची उड्डाणसेवा सुरू करण्याचेही बंधन आहे. छोट्या अंतरांचा हवाई प्रवास स्वस्त दरात घडवणारी ही जगातील पहिलीच योजना आहे.
४५ विमानतळांचे भाग्य उजळणार-
या योजनेमुळे देशातील ज्या ४५ विमानतळांचे भाग्य उजळणार आहे, त्यात उत्तर भारतातील सिमला, पठाणकोट, जालंदर, कुलू, लुधियाना, भटिंडा, डेहराडून, पंतनगर, जसैलमेर, जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर, लखनौ, गोरखपूर, कानपूर, वाराणसी, पश्चिम व मध्य भारतात पोरबंदर, द्वारका, मुद्रा, कांडला, जामनगर, भावनगर, दिव, सुरत, इंदूर, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, दक्षिण भारतातील चेन्नई व बंगळुरू या विद्यमान विमानतळांसह बीदर, विद्यानगर, म्हैसूर, विजयवाडा, विशाखापट्टणम, होसूर, सालेम, नेयवेली, पुड्डुचेरी, पूर्व भारतातील कोलकाता व भुवनेश्वर या विद्यमान विमानतळांसह अंबिकापूर, बिलासपूर, रायपूर, जगदलपूर, जैपोर, रायगड, उत्केला, रांची, बर्नपूर, दुर्गापूर, जमशेदपूर, रुरकेला, झारसुगडा, बागडोगरा, कुचबिहार तसेच ईशान्य भारतातील शिलाँग, दिमापूर, इम्फाळ, सिल्चर, अगरताळा व ऐझवाल या विमानतळांचा समावेश आहे.
प्रस्तुत योजनेनुसार सध्या हवाई सेवा सुरू असलेल्या प्रमुख विमानतळांशी पश्चिम भारतातील २४ उत्तर भारतातील १७, दक्षिण भारतातील ११, पूर्व भारतातील १२ तसेच ईशान्य भारतातील ६, अशा देशातील ४५ विमानतळांना परस्परांशी जोडण्याचा सरकारचा संकल्प आहे.