पंतप्रधान मोदींना पनीरसेल्वम भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:00 AM2017-08-15T01:00:45+5:302017-08-15T01:00:49+5:30
तमिळनाडुचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी येथे भेट घेतली.
नवी दिल्ली : तमिळनाडुचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी येथे भेट घेतली. अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या दोन गटांच्या विलिनीकरणाशी संबंधित मुद्यांवर उभय नेत्यांत चर्चा झाली.
पक्षाच्या एका गटाचे नेतृत्व पनीरसेल्वम यांच्याकडे आहे तर दुसºया गटाचे नेतृत्व मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांच्याकडे. पनीरसेल्वम आणि मोदी यांच्यात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा चालली. राज्यसभेचे सदस्य व्ही. मैथरीयन, माजी राज्य मंत्री के. पी. मुनुस्वामी आणि माजी राज्यसभा सदस्य मनोज पांडीयन यावेळी उपस्थित होते. पनीरसेल्वम आणि मोदी यांनी राज्याशी संबंधित सगळ््या महत्वाच्या विषयांवर चर्चा केली, असे मैथरीयान यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत महत्वाचा विषय होता तो दोन गटांच्या विलिनीकरणाचा. त्यांनी ‘नीट’ आणि इतर विषयांवरही चर्चा केली. गेल्या शुक्रवारी मोदी यांना पलानीस्वामी भेटले होते. त्याच दिवशी पनीरसेल्वमही मोदी यांना भेटणार होते परंतु भेट झाली नाही. मोदी यांच्याशी झालेली भेट ही राजकीय नसल्याचे पनीरसेल्वम यांनी नंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
पक्षाच्या दोन गटांचे विलिनीकरण झाल्यास मला (पनीरसेल्वम) कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल याची चर्चा त्यांनी मोदी यांच्याशी केली. राज्यातील राजकीय पेचप्रसंगाची माहिती आम्ही मोदी यांना दिली, असे ते म्हणाले.
ओ. पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी गटांचे एकमेकांत विलिनीकरण व्हावे यासाठी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आग्रह आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पनीरसेल्वम यांना उप मुख्यमंत्रीपद देऊ करण्यात आले आहे परंतु त्यांना गृह आणि सार्वजनिक बांधकाम खातेही हवे आहे. सध्या ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत.