नव्या संसदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मिच्छामी दुक्कडम'! काय आहे या शब्दाचा अर्थ, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:25 PM2023-09-19T18:25:34+5:302023-09-19T18:26:24+5:30
या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीत संबोधित करताना एक शब्द वापरला, तो म्हणजे, मिच्छामी दुक्कडम. आपण क्वचितच हा शब्द ऐकला असेल. पण, या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द कुठून आला? जाणून घेऊया.
खरे तर, मिच्छामी दुक्कडम हा शब्द जैन पंथियांमध्ये वापरला जातो. 19 सप्टेंबर 2023 ला जैन धर्मीयांच्या संवत्सरी उत्सवाला सुरूवात झाली आहे. यालाच क्षमा वाणिचे पर्वही म्हटले जाते. या पर्वात 'मिच्छामी दुक्कडम' म्हणून सर्वांना क्षमा मागितली जाते.
मिच्छामी दुक्कडममधील मिच्छामीचा अर्थ क्षमा करणे असा होतो, तर दुक्कडमचा अर्थ चुकांशी संबंधित आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, मिच्छामी दुक्कडम म्हणजे, जाणूनबुजून अथवा नकळत काही चूक झाली असेल, तर क्षमा करावी. जैन समाजातील श्वेतांबर लोक भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीपासून शुक्ल पक्षातील पंचमी, तर दिगंबर लोग भाद्रपदाच्या शुक्ल पंचमीपासून चतुर्दशीपर्यंत पर्यूषण पर्व साजरे करतात. या काळात लोक एकमेकांना भेटून मिच्छामी दुक्कडम म्हणून क्षमा मागतात. पर्यूषण पर्व काळात या शब्दाचा वापर विशेषत्वाने केला जातो.
पर्यूषण पर्व आणि मिच्छामी दुक्कडम -
जैन समाजात, पर्यूषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी मैत्री दिवस अथवा क्षमावाणी दिवसानुमित्त एकमेकांना भेटून आपल्या चुकांबद्दल क्षमा मागितली जाते. महत्वाचे म्हणजे, यात लहान-मोठा असा भेद न करता मिच्छामी दुक्कडम म्हटले जाते. खरे तर या शब्दाचा वापर केव्हाही केला जाऊ शकतो. मात्र पर्यूषण काळात हा शब्द विशेषत्वाने वापरला जातो.