भारतात घुसलेल्या 'लष्कर'च्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी
By admin | Published: December 6, 2015 01:52 PM2015-12-06T13:52:05+5:302015-12-06T13:52:48+5:30
कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तय्यबा'चे चार दहशतवादी भारतात घुसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 'निशाण्यावर' असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तय्यबा'चे चार दहशतवादी भारतात घुसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 'निशाण्यावर' आहेत, अशी खात्रीलायक माहिती गप्तचर विभागाने दिल्ली पोलिसांना दिली आहे. काही प्रतिष्ठित नामवंतांना लक्ष्य बनवून राजधानी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने आखल्याची माहिती समोर येत असून दिल्ली पोलिसा त्या दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला लष्करचे दोन संशयित सदस्य दुजाना आणि उकाशा यांच्याबद्दल गोपनीय सूचना प्राप्त झाल्यानंतर, हा कट उघडकीस आल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला. या दोघांनी पाकव्याप्त काश्मिरातून जम्मू-काश्मिरात घुसखोरी केली व आता ते दिल्लीत शिरल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी जेथे असतीली तेथे पॅरिससारखा अथवा मुंबईतील २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. दहशतवाद्यांमधील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले असून त्यात ‘व्हीआयपी’ हा शब्द अनेकवेळा उच्चारण्यात आला आहे.
दरम्यान या सर्व माहितीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू असून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रेनेडहल्ला शक्य
दुजाना आणि उकाशा हे दोघे लष्करचे सदस्य प्रदीर्घ काळ काश्मीर खोऱ्यात राहिले आहेत व दिल्लीत नामवंत लोकांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती अथवा ग्रेनेडहल्ला करण्याची त्यांची योजना आहे. या हल्ल्यात ते स्वत:चा वा लष्करच्या अन्य सदस्याचा वापर करू शकतात.