पंतप्रधान मोदी हेच असहिष्णुतेचे बळी
By admin | Published: November 2, 2015 03:17 AM2015-11-02T03:17:22+5:302015-11-02T03:17:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केला.
या दोन पक्षांनी दुहेरी व्यूहरचना आखली आहे. संसदेतील कामकाजाचा खोळंबा करणे आणि मोदी सरकारला सुधारणांचे श्रेय मिळवू न देणे हा पहिला भाग तर संघटित अपप्रचार करीत सामाजिक एकोप्याचे वातावरण बिघडविणे हा या रणनीतीचा दुसरा भाग आहे. भारताची असहिष्णू समाज म्हणून प्रतिमा समोर आणण्याचा खटाटोप सुरू आहे, असेही ते म्हणाले.
मोदी यांच्या नेतृत्वात सरकार देशाच्या विकासाला गती देत असताना काही जणांनी भाजपा सत्तेवर आहे ही कल्पनाच बौद्धिकदृष्ट्या स्वीकारलेली नाही.
आपल्या ‘बॉस’ला (मोदी) खूश करण्यासाठी जेटली यांनी ही हास्यास्पद विधाने केलेली आहेत, असे म्हणत काँग्रेसने जेटलींवर पलटवार केला. पक्षाचे प्रवक्ते अजय कुमार म्हणाले की, सामान्य माणसापासून राष्ट्रपतींपर्यंत, मूडीजपासून उद्योगपतींपर्यंत, पुस्तकांच्या वाचकांपासून ती लिहिणाऱ्यांपर्यंत सर्वच जण देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त करीत असताना जेटलींना असे बोलणे शोभणारे नाही; शिवाय त्यांचे विधान हास्यास्पद आहे.