पंतप्रधान मोदींनी वाचला काँग्रेसी नेत्यांच्या अपशब्दांचा पाढा, साप, विंचू आणि डॅश डॅश डॅश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 09:10 PM2017-12-08T21:10:10+5:302017-12-08T21:25:50+5:30
मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.
अहमदाबाद - काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींचा उल्लेख नीच असा केल्यापासून गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या हाती आयता मुद्दा मिळाला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मला शिव्याशाप देऊन थकत नाही, पण मी शांत राहतो, असे सांगत मोदींनी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, काँग्रेसने मला पहिल्यांदा नीच म्हटलेले नाही. सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी याआधीही असे केले आहे. मी नीच का आहे? कारण मी गरीबाच्या घरी जन्माला आलोय. कारण माझी जात खालची आहे. कारण मी गुजराती आहे. हीच कारणे आहेत का माझा द्वेश करण्यासाठी." गुजरातमध्ये शनिवारी पहिल्या फेरीचे मतदान होणार आहे. तर 14 डिसेंबर रोजी दुसऱ्या फेरीचे मतदान होईल.
त्याआधी आज सकाळी झालेल्या सभेतही मोदींनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता. 2015 साली मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या पाकिस्तान दौ-यात नरेंद्र मोदींना मार्गातून हटवा असे विधान केले होते. अय्यर यांच्या त्याच विधानाचा धागा पकडून मोदींनी काँग्रेसची कोंडी केली.
मोदींना मार्गातून हटल्यानंतरच भारत-पाकिस्तानमध्ये शांतीसंबंध सुधारु शकतात असे अय्यर त्यांच्या पाकिस्तान दौ-यात म्हणाले होते. मला मार्गातून हटवायचे म्हणजे नेमके काय? अय्यर यांना नेमके काय म्हणायचे होते? माझा गुन्हा काय? आम्हाला लोकांचा आशिर्वाद आहे असे मोदी म्हणाले. पाकिस्तानातील एका टॉक शो मध्ये बोलताना अय्यर यांनी हे विधान केले होते.
भारत-पाकिस्तान संबंधात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न पाकिस्तानी वाहिनीच्या अँकरने विचारला होता. त्यावर अय्यर यांनी सर्वात प्रथम मोदींना हटवले पाहिजे त्यानंतरच चर्चा पुढे जाऊ शकते असे उत्तर दिले होते. आपल्याला अजून चारवर्ष थांबावे लागेल. मोदी असताना भारत-पाकिस्तानसंबंध सुरळीत होतील असे आपल्याला वाटत नाही असे अय्यर म्हणाले होते. अय्यर यांनी भारतात परतल्यानंतर असे कुठलेही विधान केल्याचे नाकारले होते. गुजरात निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना अय्यर यांनी केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.