वाढदिवशी पंतप्रधान मोदी चित्त्यांना सोडणार जंगलात; वन्यप्रेमींमध्ये उत्सुकता, आठ नामिबियन चित्ते दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 10:13 AM2022-09-07T10:13:07+5:302022-09-07T10:15:05+5:30
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी याबाबत सांगितले की, या सोहळ्याला पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत व चित्ते जंगलात तसेच कोरड्या गवताळ प्रदेशात सोडण्याच्या ऐतिसाहिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
अभिलाष खांडेकर -
भोपाळ : देशभरातील वन्यप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर रोजी नामिबियाचे ८ चित्ते मध्यप्रदेशच्या पालपूर-कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहेत. मागील सात दशकांपासून भारतात नसलेल्या या चित्त्यांच्या आगमनाबाबत वन्यप्रेमी तसेच नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी याबाबत सांगितले की, या सोहळ्याला पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत व चित्ते जंगलात तसेच कोरड्या गवताळ प्रदेशात सोडण्याच्या ऐतिसाहिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. हे राष्ट्रीय उद्यान उत्तरेकडील उष्णकटिबंधीय पानझड क्षेत्राखाली येत असून, त्यातून कुनो नदी बारमाही वाहते.
भारताने हे चित्ते नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून खरेदी केलेले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील चित्ते या वर्षांच्या उत्तरार्धात येत आहेत. त्या देशातील वन्यजीवतज्ज्ञ राष्ट्रीय उद्यानात या आठवड्यात भेट देण्यासाठी आलेले आहेत. सोमवारी ते उद्यानात पोहोचले व दोन दिवसांनी दिल्लीमार्गे मायदेशी परततील, असे सूत्रांनी लोकमतला सांगितले.
वने व पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए), मध्यप्रदेश वन्य विभाग व भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून या सर्वांच्या प्रयत्नातून विविध संशोधनांद्वारे चित्ता वर्षानुवर्षे येथे राहावा, यासाठी तयारी करीत आहेत. २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने चित्ते भारतात आणण्याचा मार्ग मोकळा केला होता.
मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम
मध्यप्रदेशातील जंगलात चित्ता सोडण्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कुनो राष्ट्रीय उद्यानात हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली असून तेथे काही हेलिपॅड उभारण्यात येत आहेत.