सुरक्षा परिषदेसाठी पंतप्रधान मोदींची बॅटिंग, ‘जी-२०’समारोपाकडे जाताना उपस्थित केला कळीचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 06:39 AM2023-09-11T06:39:54+5:302023-09-11T06:40:38+5:30
G20 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जी-२०’ परिषदेवर पडदा पडता पडता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासाठी आणि सर्व जागतिक संस्थांमधील सुधारणांसाठी जोरदार भूमिका मांडत एकप्रकारे भारताला त्यात स्थान देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जी-२०’ परिषदेवर पडदा पडता पडता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासाठी आणि सर्व जागतिक संस्थांमधील सुधारणांसाठी जोरदार भूमिका मांडत एकप्रकारे भारताला त्यात स्थान देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. त्यात नवीन वास्तव प्रतिबिंबित झाले पाहिजे असे स्पष्ट करीत मोदींनी जे वेळेनुसार बदलत नाहीत, ते प्रासंगिकता गमावतात, हा निसर्गाचा नियम आहे, असा आरसा दाखवला.
समारोपाच्या ‘वन फ्युचर’ सत्रात मोदींनी ब्राझीलकडे पुढील अध्यक्षपदाची सूत्रे सोपवून शुभेच्छा दिल्या. ब्राझील १ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेईल.
मोदी म्हणाले, “जगाला चांगल्या भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी, जागतिक व्यवस्था सध्याच्या वास्तवानुसार असणे आवश्यक आहे. आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद याचे उदाहरण आहे. जेव्हा संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली तेव्हा जग आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांत ५१ संस्थापक सदस्य होते. आज ही संख्या २०० च्या आसपास आहे. असे असूनही, सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यांची संख्या तेवढीच आहे.”
गेल्या अनेक वर्षांत अनेक प्रादेशिक गट निर्माण झाले आहेत आणि ते प्रभावी ठरले आहेत, हे विचारात घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवरच शनिवारी आफ्रिकी संघाला जी-२० चे सदस्य बनवून एक ऐतिहासिक पुढाकार घेण्यात आला आहे, हेही मोदींनी निदर्शनास आणून दिले. आगामी परिषद होणार त्या ब्राझीलला शुभेच्छा देत मोदींनी शिखर परिषद समाप्तीची घोषणा केली.
ब्राझील अध्यक्षांच्या भाषणात मोदींच्या भाषणाचे प्रतिबिंब
- जागतिक संस्थांमधील सुधारणांसाठी मोदींनी धरलेल्या आग्रहाचे प्रतिध्वनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या भाषणात उमटले.
- ते म्हणाले की, राजकीय ताकद पुन्हा मिळविण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला स्थायी सदस्य म्हणून नवीन विकसनशील देशांची आवश्यकता आहे.
- आम्हाला जागतिक बँक आणि आयएमएफमध्ये अधिक प्रतिनिधित्व हवे आहे.
जी-२० च्या माजी, भावी अध्यक्षांनी मोदींना दिले रोपटे
जी-२० चे माजी अध्यक्ष इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो आणि जी-२०चे भावी अध्यक्ष ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी जी-२०चे विद्यमान अध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी एक-एक रोपटे भेट दिले. ‘एक भविष्य’ या संकल्पनेवरील जी-२० शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीला प्रतिकात्मक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
आभासी आढावा घ्या...
जी-२० शिखर परिषदेवर पडदा पडला असताना, मोदींनी नेत्यांच्या परिषदेत केलेल्या सूचना आणि निर्णयांचा आढावा घेण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस गटाचे आभासी सत्रदेखील प्रस्तावित केले.
फ्रान्सच्या अध्यक्षांशी मोदींची द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. उभय नेत्यांनी अनेक विषयांवर विचारांची देवाण-घेवाण केल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदींनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत दुपारच्या जेवणावेळी खूप फलदायी बैठक झाली.’
ब्रिटन देणार २ अब्ज डॉलर्सचेे योगदान
- ब्रिटन हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यासाठी हरित हवामान निधीला (जीसीएफ) दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सचे योगदान देणार आहे.
- हवामान बदलाच्या मुकाबल्यात जगाला मदत करण्याच्या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे, असे ब्रिटनने रविवारी सांगितले.
- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यात जगातील कमकुवत लोकांना मदत करण्यासाठी हे आर्थिक योगदान जाहीर केले आहे, असे भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी सांगितले.
- जी-२० नेत्यांना संबोधित करताना सुनक म्हणाले, ‘यूके कार्बन उत्सर्जन कमी करून जगातील सर्वात असुरक्षित लोकांना हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास मदत करून आपल्या हवामान वचनबद्धतेची पूर्तता करत आहे.’