पंतप्रधान मोदींचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:35 AM2019-09-22T02:35:21+5:302019-09-22T02:35:32+5:30
आठव्या मजल्यावरून पडल्याने अपघात
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र आणि पतंजली योगपीठाचे सदस्य हरिकृष्ण घनशामदास शहा (६४) यांचे आठव्या मजल्यावरील गच्चीतून पडून शनिवारी सायंकाळी येथे दुर्दैवी निधन झाले.
नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथील गावचे मूळ रहिवासी असलेले शहा हे त्यांचे वर्गमित्र होते. मोदींच्या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. सायंकाळी ते त्यांचे मावसभाऊ सुरेश मेहता यांच्या गोखलेनगरमधील तपोवन येथील घरी कुटुंबीयांसह गेले होते. घरगुती कार्यक्रम संपल्यावर त्यांनी कुटुंबीयांना ‘प्राणायाम करून येतो’ असे सांगितले. सव्वा सातच्या सुमारास ते अचानक गच्चीतून खाली पडले आणि उपचारापूर्वीच निधन झाले. उंचावरून पाहिल्यावर चक्कर येणारा ‘व्हर्टिगो’ हा विकार असल्याने हा अपघात घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मोदींच्या आईकडून खाल्ला होता मार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेत असताना मगरीचे पिलू पकडून आणले होते. घरी आल्यावर त्यांची आई रागावली. ‘तुला जर कोणी आईपासून दूर केले तर कसे वाटेल?’ असे विचारून मोदी आणि त्यांच्याबरोबरील हरिकृष्ण यांना त्यांनी रट्टे लगावले होते.