आचारसंहितेपूर्वी उद्घाटने, पायाभरणींचा धडाका लावा, पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:36 AM2019-03-05T06:36:44+5:302019-03-05T06:38:59+5:30
आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ ८ मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत,
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ ८ मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही ८ मार्चच्या आधी करून टाकावीत, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व मंत्रालयांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा ९ मार्च रोजी होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
स्वत: पंतप्रधान मोदी ८ मार्चपर्यंत देशातील विविध केंद्रीय प्रकल्पांची उद्घाटने व पायाभरणी समारंभ करण्यात गुंतलेले असतील. त्या निमित्ताने ते सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवर राजकीय टीकाही करीत आहेत. आचारसंहितेनंतर सरकारी व्यासपीठाचा अशा कारणासाठी त्यांना वापर करता येणार नाही.
रस्ते वाहतूक, रेल्वे, कोळसा, ऊ र्जा, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान, पेट्रोलियम, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलाद, खाण उद्योग, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, आरोग्य, तसेच संरक्षण विभागाशी संबंधित प्रकल्पांवर मोदी सरकारने भर दिला होता. त्याचा फायदा निवडणुकांत मिळावा, यासाठीच हे आदेश देण्यात आले आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल, आर. के. सिंह यांचे प्रकल्प प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित असल्याने त्यांवर भर देण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या ज्या प्रकल्प निरीक्षण गटातर्फे पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वच प्रलंबित प्रकल्पांवर लक्ष ठेवले जात होते, त्या गटाने १0. ६७ लाख कोटी रुपयांच्या ३,१00 प्रकल्पांचे मार्ग मोकळे केले. हा गट २0१५ मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्यांची माहिती लोकांना द्या आणि २0१४ साली दिलेल्या आश्वासनांतील किती प्रकल्प पूर्ण केले, तेही सांगा, असे मंत्र्यांना सांगण्यात आले आहे.
मनुष्यबळ विकास, वाणिज्य, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, पर्यावरण आदी मंत्रालयांनीही आपल्या कामांचे अहवाल लोकांपर्यंत जाऊ द्या, असे पीएमओने सांगितले आहे. प्रकाश जावडेकर यांनी सर्वच विद्यापीठांचे कुलपती व कुलगुरू यांच्या नेमणुका पूर्ण केल्या आहेत आणि आश्वासनानुसार नवे शैक्षणिक धोरणही तयार केले आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा केली की, आचारसंहिता लगेच लागू होईल आणि मग प्रकल्पांची उद्घाटने वा पायाभरणी समारंभ करता येणार नाहीत. नव्या योजनांचीही घोषणा करता येणार नाही. त्यामुळे नव्या योजनांची घोषणाही लगेच करून टाका, असे मंत्रालयांना सांगण्यात आले आहे.
>श्रमयोगी मानधन योजना आज होणार जाहीर?
आपण ज्या उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रमांना जात आहोत, तिथे संबंधित खात्याच्या मंत्र्याने उपस्थित राहण्याचे कारण नाही. त्याऐवजी तुम्हीच तुमच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू करा, असे पंतप्रधानांनी कार्यालयामार्फत सर्व मंत्र्यांना कळविले आहे. पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, तिथे ते मंगळवारी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.