“भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय जोडले गेले”: पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 01:03 PM2023-09-09T13:03:39+5:302023-09-09T13:05:00+5:30
Pm Narendra Modi First Speech In G20 Summit: जी-२० शिखर परिषदेला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी न करता ‘भारत’ अशी करुन दिली.
Pm Narendra Modi First Speech In G20 Summit: देशात जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेच्या सुरुवातीला सर्व देशांच्या नेत्यांचे, प्रमुखांचे स्वागत केले. तसेच भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय या परिषदेशी जोडले गेले, असे नमूद केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी न करता ‘भारत’ अशी करुन दिली. भारत नावाची पाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनासमोर लावण्यात आली.
२१ व्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ आहे. या काळात अनेक वर्षांपासूनची आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत आणि या समस्यातून तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे आशेने पाहिले जात आहेत. यासाठी मानवकेंद्रीत दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाला जबाबादारीने पुढे जायचे आहे. यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक बनू शकतो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय जोडले गेले
भारताचे जी २० परिषदेचे अध्यक्षपद देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर समावेशकता आणि सर्वांना सोबत घेण्याचे प्रतिक झाले आहे. देशातील ६० शहरांमध्ये २०० हून अधिक बैठका झाल्या. भारतात जी-२० जनतेची परिषद झाली आहे. कोट्यावधी भारतीय या परिषदेबरोबर जोडले गेले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार असो, उत्तर आणि दक्षिणमधील विभागणी असो, पूर्व आणि पश्चिममधील दुरावा असो, अन्न, इंधन आणि खते यांचे व्यवस्थापन असो, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य, उर्जा आणि पाणी सुरक्षा असो, वर्तमानासह भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला या आव्हानांवर उपाययोजना करण्याकडे वाटचाल करावी लागणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
या जी २० शिखर परिषदेला सुरुवात करुया
आपण ज्या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर ‘मानवतेचे कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केले जायला हवे’, असा संदेश देण्यात आला आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीने हा संदेश जगाला दिला होता. या संदेशानिशी आपण या जी २० शिखर परिषदेला सुरुवात करुया, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.