Narendra Modi: 'पंतप्रधान घमेंडखोर; कृषी कायद्यांवरून आमच्यात वादंग'; सत्यपाल मलिकांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:21 AM2022-01-04T06:21:03+5:302022-01-04T06:21:13+5:30
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक : घणाघाती टीकेद्वारे भाजपला घरचा आहेर
बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : तीन नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो असताना पहिल्या पाच मिनिटांतच आमच्यात वाद झाला. मोदी हे अतिशय घमेंडखोर आहेत अशी परखड टीका मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. भाजपच्या एका महत्त्वाच्या नेत्यानेच आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे.
हरियाणा येथील चरखी दादरी भागात स्वामी द्याल धाममध्ये आयोजिलेल्या एका कार्यक्रमात सत्यपाल मलिक यांनी थेट पंतप्रधानांवरच टीकेचा भडिमार केला. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकला आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये ५००हून अधिक शेतकरी मरण पावले. ते माझ्यासाठी मेले का, असे उद्गार मोदींनी आपल्याकडे काढल्याचा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. शेतकरी आपल्यासाठीच मेले आहेत. एखाद्या राजाप्रमाणे तुमचे वर्तन आहे असे प्रत्युत्तर मी मोदींना दिले, असेही मलिक यांनी सांगितले.
त्यांनी दावा केला की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर यापुढे चर्चा करायची असल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटा, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांवर दाखल केलेले खटले रद्द करावेत तसेच किमान हमीभावासाठी केंद्र सरकारने कायदा करायला हवा, असेही मलिक म्हणाले.
मोदींचे ‘गुण’ लोकशाहीसाठी चिंतेचा विषय : काँग्रेस
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या ‘गुुणांची’ जाहीर वाच्यता केली, लोकशाहीच्या दृष्टीने तो अतिशय चिंताजनक प्रकार आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे.
शहांबद्दलच्या वक्तव्यापासून घूमजाव
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आदर आहे. त्यांनी माझ्याकडे जे उद्गार काढले त्यामागे मोदींचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता, असे सत्यपाल मलिक यांनी आपल्या मूळ वक्तव्यापासून घूमजाव केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भरकटले होते. मात्र, तुम्ही आमच्याशी संपर्कात तसेच चर्चा करत राहा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला सांगितल्याचे मलिक यांनी म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, त्या वक्तव्यावरून विरोधकांनी खूप टीका केल्याने मलिक यांनी लगेच सारवासारव केली.