पंतप्रधान माेदी रकाबगंज गुरुद्वारामध्ये नतमस्तक, अचानक भेट ठरल्याने सर्वांना आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:34 AM2020-12-21T05:34:13+5:302020-12-21T05:36:01+5:30
Narendra Modi : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी आंदाेलन करीत आहेत. त्यातही पंजाबमधील शेतकरी जास्त आक्रमक आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भल्या पहाटे दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथे अचानक भेट देऊन शिखांचे नववे गुरू तेग बहादुर यांना श्रद्धांजली वाहिली.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी आंदाेलन करीत आहेत. त्यातही पंजाबमधील शेतकरी जास्त आक्रमक आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुद्वाराला भेट दिली. रकाबगंज साहिब गुरुद्वारा हे शीख समुदायाचे दिल्लीतील मानाचे धार्मिक स्थळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा व्यवस्थापनालाही पंतप्रधान इथे येणार याबाबत काेणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या भेटीच्या वेळी या परिसरात कुठलाही विशेष पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला नव्हता.
तसेच सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी काेणत्याही प्रकारचे निर्बंध नव्हते.
गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर माेदींनी ट्विटरवरून छायाचित्रे पाेस्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ट्विटरवरील संदेशात लिहिले आहे, की ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथे भेट देऊन प्रार्थना केली. मी धन्य झालाे. जगभरातील लाखाे बांधवांप्रमाणे मीदेखील गुरू तेग बहादुरजी यांच्यापासून प्रेरित झालाे आहे.
शिखांचे नववे गुर असलेले गुरू तेग बहादुर यांची शनिवारी पुण्यतिथी हाेती. त्यानिमित्ताने ट्विट करून माेदींनी त्यांना आदरांजली वाहिली हाेती.
गेल्या २३ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदाेलन सुरू आहे. त्यात २९ हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात रविवारी श्रद्धांजली दिवस पाळण्यात आला. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी गुरुद्वाराला भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विराेधकांनी हा डॅमेज कंट्राेलचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.
१४ बड्या अडत्यांना प्राप्तिकराची नोटीस
पंजाबमध्ये शेतीमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारातील सुमारे १४ बड्या अडत्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील काही जणांवर या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला धमकाविण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, असा या अडत्यांचा आरोप आहे.
‘किसान एकता माेर्चा’ युट्यूब चॅनेलही
दिल्लीच्या सीमेवर आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘किसान एकता माेर्चा’ या नावाने एक युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. २५ डिसेंबरपर्यंत २५ लाख सबस्क्रायबर्स या चॅनेलला मिळवून दाखविण्याचे आव्हान शेतकरी नेत्यांनी पंतप्रधान माेदींना दिले आहे.
शेतकऱ्याची आत्महत्या
पंजाबमधील आणखी एका २२ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केली. भटिंडा जिल्ह्यातील हा शेतकरी हाेता. विविध कारणांनी मृत्यूुमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आता ३० वर पाेहाेचला आहे.
शेतकरी सन्मान योजनेचा पुढचा हप्ता
पंतप्रधान शेतकरी सन्मान याेजनेचा पुढील हप्ता २५ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्य जयंतीला पैसे जमा हाेतील, असे माेदींनी सांगितले.