अयोध्येत मोदींचे जय श्रीराम, पण मंदिराच्या मुद्द्यापासून राहिले लांब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 03:01 PM2019-05-01T15:01:41+5:302019-05-01T15:02:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत घेतलेल्या प्रचारसभेमध्ये राम, रामायण आणि दहशतवादाचा उल्लेख केला. मात्र...
अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत घेतलेल्या प्रचारसभेमध्ये राम, रामायण आणि दहशतवादाचा उल्लेख केला. मात्र राम मंदिराच्या मुद्द्याचा उल्लेख करणे मोदींनी टाळले. मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका करतान दहशतवादाविरोधात उचललेल्या कडक पावलांचाही उल्लेख केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करत सांगितले की, ''आज कोलंबोमध्ये जी स्थिती आहे तशीच परिस्थिती 2014 पूर्वी भारतात होती. गेल्या पाच वर्षांत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होण्याच्या बातम्या येणे बंद झाले. फैजाबाद येथे कसे आणि किती स्फोट झाले हे विसरता येणार नाही. मात्र हा नवा भारत आहे, जो अशी आगळीक झाल्यास घरात घुसून मारेल. गेल्या पाच वर्षांत बॉम्बस्फोटाचे वृत्त येणे बंद झाले म्हणजे दहशतवाद संपला असे नाही. दहशतवाद्यांची फॅक्टरी तर आपल्या शेजारच्या देशात अजूनही चालूच आहे.''
मोदींनी यावेळी सपा-बसपा महाआघाडीवरही जोरदार टीका केली. सपा, बसपा आणि काँग्रेसची दहशतवादाबाबतची भूमिका मवाळ राहिलेली आहे. जेव्हा सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना पकडले जायते तेव्हा मतांच्या राजकारणासाठी ही मंडळी त्यांना सोडून द्याचयी. या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. मात्र महामिलावटी मंडळी पुन्हा एकदा देशात दुबळे सरकार आणू इच्छित आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे मोदींनी सांगितले.