"गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली", पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:09 PM2023-03-29T14:09:59+5:302023-03-29T14:11:07+5:30
narendra modi on girish bapat : पुण्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीष बापच यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले.
girish bapat news । मुंबई : पुण्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीष बापट यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदांवर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बापट यांच्या निधनानंतर राज्यासह देशभरातील राजकीय नेतेमंडळी शोक व्यक्त करत आहेत. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापट यांच्यासाठी खास ओळी लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "श्री गिरीश बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, ज्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा हात आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती."
Shri Girish Bapat Ji was a humble and hardworking leader who served society diligently. He worked extensively for the development of Maharashtra and was particularly passionate about Pune's growth. His passing away is saddening. Condolences to his family and supporters. Om Shanti pic.twitter.com/17M0XpcwpF
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023
सर्वांचे 'भाऊ'
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात 'भाऊ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा देखील दिला होता. आणीबाणीनंतर गिरीश बापटा यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1983 मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत ते नगरसेवक झाले. सलग तीन वेळा बापट नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
2019 मध्ये प्रथमच खासदार
गिरीश बापट यांनी 1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली होती. पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 1669 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी बापट यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला होता.
पक्षासोबतची एकनिष्ठता
मविआचे सरकार पडल्यानंतर भाजप पक्षासाठी कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावण्यात आली. कसबा पेठ निवडणुकीवेळी खासदार गिरीश बापट स्वतः भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. गिरीश बापट हे व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले होते. प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आणि पक्षाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली होती. यावेळी ते व्हीलचेअरवर आले होते. नाकात ऑक्सिजनची नळी, व्हीलचेअरला ऑक्सिजन सिलेंडर लावून ते केसरी वाडा येथे आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"