"जर त्यांच्याकडे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:09 PM2023-06-27T14:09:49+5:302023-06-27T14:10:31+5:30
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशातील १५ विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजुटीचा नारा दिला आहे.
भोपाळ : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशातील १५ विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजुटीचा नारा दिला आहे. अलीकडेच बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी ऐक्याची बैठक पार पडली. विरोधकांच्या बैठकीवेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावर होते. पण, आज त्यांना मध्य प्रदेशातील भोपाळ येथील जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांच्या एकीवरून त्यांना लक्ष्य केले. "पाटण्यातील बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली", अशी टीका मोदींनी केली. ते भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.
विरोधकांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, पाटणाच्या बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. घोटाळाविरोधी कारवाईतून विरोधी पक्ष पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट नेते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला हमी देतो की, मी त्यांच्यापैकी कुणालाही सोडणार नाही आणि प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई करेन. जर विरोधकांकडे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर माझ्याकडेही तुम्हा सर्वांसाठी एकच गॅरंटी आहे आणि ती म्हणजे भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांना मी सोडणार नाही. आज जेव्हा त्यांच्यावर कारवाई होत आहे, हे पाहून ते एक आले आहेत.
#WATCH | "If they have the guarantee of scams and corruption then I also have one guarantee for all of you and it is I will not spare any of those who are involved in the corruption...Today when action is being taken against them (Opposition), they are coming together and forming… pic.twitter.com/3xXnNQeH1z
— ANI (@ANI) June 27, 2023
"भाजपची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आज या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो, याद्वारे मी भाजपच्या सुमारे १० लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करू शकलो. इतिहासात राजकीय पक्षाचा असा एकही कार्यक्रम आजवर झालेला नाही", असेही मोदींनी सांगितले.
विरोधकांचा घेतला समाचार
दरम्यान, पाटण्यात जे विरोधक एकवटले होते, त्यांची यादी केली तर सर्व पक्षांनी मिळून एकूण २० लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तसेच एकट्या कॉंग्रेस पक्षाने जवळपास लाखो कोटींचा घोटाळा केला, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ७० कोटी रूपये घोटाळा असल्याचा आरोप असून त्यांचीही यादी मोठी असल्याचे मोदींनी म्हटले.