सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही... भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा पंतप्रधानांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 05:19 AM2024-02-19T05:19:24+5:302024-02-19T05:21:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका अजून व्हायच्याच आहेत, पण विरोधी पक्षांचे नेतेही ‘एनडीए सरकार चारसौ पार’च्या घोषणा देत आहेत. आपल्याला आतापासूनच देश-विदेशातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची निमंत्रणे आली आहेत. याचा अर्थ विरोधकांप्रमाणेच केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येईल याविषयी जगातील विविध देशांनाही पूर्ण खात्री आहे. त्यामुळे ‘सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही...’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
विकसित भारताच्या संकल्पात पुढील पाच वर्षे भूमिका निर्णायक ठरणार आहे. या कालखंडात भारताला पूर्वीपेक्षा अनेक पट वेगाने काम करून मोठी झेप घ्यायची आहे. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनविण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक अनेक पटींनी, चार दिशांनी विस्तार करणे असा या संकल्पाचा अर्थ आहे. या सर्व लक्ष्यांची पूर्तता करण्यासाठी भाजपचे सत्तेत पुनरागमन होणे आवश्यक आहे. ‘एनडीए सरकार, चारसौ पार’साठी भाजपला ३७० चा मैलाचा दगड पार करावाच लागेल, असे मोदी प्रगती मैदानावरील भारत मंडपम् येथे राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी म्हणाले.
राजकारणासाठी नव्हे, तर राष्ट्रनीतीसाठी...
एनडीए सरकारचा १० वर्षांचा कलंकरहित कार्यकाळ आणि २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून बाहेर काढणे ही सामान्य कामगिरी नाही. आम्ही देशाला महाघोटाळे, अतिरेकी हल्ल्यांपासून मुक्ती दिली. गरीब आणि मध्यम वर्गाचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला.
आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी निघालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सत्तेचा आनंद घेतला नाही, तर आपली मोहीम सुरू ठेवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेताना मी आपल्या सुख-वैभवासाठी जगणारी व्यक्ती नाही.
सत्ता उपभोगासाठी आपण तिसरी टर्म मागत नाही. राष्ट्रसंकल्पासाठी अनेक निर्णय घ्यायचे शिल्लक आहेत. स्थिरता, घराणेशाही आणि तुष्टीकरणाची जननी, अशा शब्दात मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्ला चढविला.
प्रत्येकापर्यंत माझा नमस्कार पोहोचवा!
भाजप कार्यकर्ते वर्षाचा प्रत्येक दिवस, २४ तास देशाची सेवा करीत असतात. आज १८ फेब्रुवारी आहे. १८ वर्षे पूर्ण केलेले नवे तरुण १८ व्या लोकसभेत मतदान करतील.
पुढील शंभर दिवसांत कार्यकर्त्यांनी नवी ऊर्जा, उत्साह, जोश आणि विश्वासाने प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ-परंपरेपर्यंत प्रत्यक्षात पोहोचावे.
नमो ॲपच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत माझे पत्र आणि नमस्कार पोहोचवावा, असे आवाहन मोदी यांनी केले.
पुढील १ हजार वर्षे देशात ‘रामराज्य’
अधिवेशनात रविवारी अयोध्येतील राम मंदिराबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. राम मंदिरामुळे पुढील १,००० वर्षांसाठी भारतात 'रामराज्या'ची स्थापना होईल. राम मंदिर ‘राष्ट्रीय जाणिवेचे’ मंदिर बनले आहे आणि ‘विकसित भारत’ उभारणीसाठी घेतलेल्या संकल्पांची पूर्तता करण्यात निर्णायक भूमिका बजावेल. ‘भाजपचे हे अधिवेशन प्रभू श्रीरामाचा अभिषेक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन करते’, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.