पंतप्रधानांची शिस्त आणि प्रदूषणाविषयीची चिंता; कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:14 AM2021-11-11T09:14:12+5:302021-11-11T09:14:43+5:30
कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात आहे. दिवाळीच्या दिवशी येथील वायु गुणवत्ता निर्देशांक १००० वर गेला होता. अजुनही येथील प्रदूषण धोकादायक पातळीत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत असतातच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनांची अनावश्यक एनर्जी वाचविण्याचा व प्रदूषण टाळण्यासाठी अभिनव प्रयोग सुरू केला आहे.
दर पंधरा दिवसाला पंतप्रधान मंत्री परिषदेची बैठक घेत असतात. येथील सुषमा स्वराज मेमोरियल हॉलमध्ये ही बैठक पार पडते. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, २ स्वतंत्र प्रभार असलेले, तर ४५ राज्यमंत्री आहेत. या बैठकीला आता कॅबिनेट मंत्र्यांच्या वाहनातून दोन राज्यमंत्री येतात. यामुळे वाहनांचा ताफा एकतृतीयांश कमी होतो.
मंत्र्यांच्या मागेपुढे असणाऱ्या सुरक्षा वाहनांनाही फाटा देण्यात आला आहे. प्रदूषण आणि अनावश्यक वाहने पाहता मोदींनी ‘कार पूल’ करण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या विभागात फेरफटका मारून अधिकारी ते कारकुनापर्यंत सगळ्यांशी चर्चा करावी, त्यांच्या संपर्कात असावे आणि मंत्र्यांच्या टेबलावर कोणतीही फाइल चार दिवसांपेक्षा अधिक काळ पडून राहू नये, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.
- कोणत्या कॅबिनेट मंत्र्यांसह तुम्ही बैठकीला यायचे आहे याची सूचना राज्यमंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून देण्यात येते. या प्रवासातून कॅबिनेट व राज्यमंत्र्यामध्ये सौहार्द, संवाद वाढविणे हाही उद्देश आहे.
- विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान सगळ्यात मागे बसतात. ज्या मंत्र्यांचे नाव घेतले गेले की, त्याने आपल्या विभागाने काय केले, याबाबतचा आढावा सादर करायचा असतो.
- यात केवळ २० मंत्र्यांचा नंबर लागतो. परंतु कोणत्या मंत्र्यांचे नाव पुकारले जाईल हे त्या वेळेपर्यंत त्या मंत्र्यालाही माहीत नसते. त्यामुळे सगळेच संपूर्ण तयारीनिशी जातात.