पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला ट्विटरवर फॉलो करणे हे त्याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट नाही - भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 08:48 AM2017-09-08T08:48:10+5:302017-09-08T08:56:17+5:30
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं
नवी दिल्ली, दि. 8 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान भाजपाने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू मांडली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला फॉलो करणे हे त्या व्यक्तीचं चारित्र्य प्रमाणपत्र नाही. त्याचप्रमाणे ती व्यक्ती कसं वागेल याची ती गॅरंटीही नाही' असं भाजपाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालविया बोलले आहेत. हा वाद अयोग्य असल्याचंही ते बोलले आहेत.
देशातील वातावरण बिघडवण्याचं काम करणा-या अनेकांना पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदींवर टीका केली होती. या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा विरोधकांना अश्लिल भाषेचा वापर करत धमक्या दिल्या जातात असा आरोप विरोधकांनी केला होता.
अमित मालविया यांनी यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे बोट दाखवत त्यांच्या फॉलोअर्सकडून होणा-या अश्लिल भाषेचा वापर आणि धमक्यांबद्दल कोणी बोलत नसल्याचं सांगितलं. 'हा वाद फक्त हास्यास्पद आणि खोटा नाही, तर निवडक लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराचं प्रदर्शन आहे', असं अमित मालविया बोलले आहेत.
The controversy over PM following people on Twitter is mischievous and contorted: Shri @malviyamit, National Head - Information & Technology pic.twitter.com/8Ss6fgCOj2
— BJP (@BJP4India) September 7, 2017
यावेळा त्यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांसोबत मिसळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ख-या अर्थाने विश्वास असणारे मोदी दुर्मिळ नेते आहेत. त्यांनी ट्विटरवर कधीच कोणाला अनफॉलो केलेलं नाही'. याआधी पीएमओ हॅण्डलवरुन अनेकांना अनफॉलो करण्यात आलं होतं, पण मोदींनी तसं केलं नाही असं अमित मालविया यांनी सांगितलं आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनाही ट्विटरवर फॉलो करतात ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत. राहुल गांधींवर धोखाधडी केल्याचा आरोप आहे, तर अरविंद केजरीवाल वारंवार मोदींवर टिप्पणी करत असतात', असंही अमित मालविया बोलले आहेत.
काँग्रेसने मात्र अमित मालविया यांच्या स्टेटमेंटमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलं आहे. पक्षाचा आणि भाजपा सरकारचा काय अजेंडा आहे हे लोकांना कळलं असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर आरएसएसने आनंद साजरा करत मिठाई वाटली होती, ज्यामुळे सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती याची आठवण मोदींना आणि भाजपाला काँग्रेसने करुन दिली आहे.